जीआरपी वसाहतीत जीव मुठीत घेऊन करावा लागतो रहिवास

0

भुसावळ। जीआरपी पोलिस वसाहतीची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. याच जीर्ण वसाहतीत पोलिस कर्मचार्‍यांना रहावे लागत आहे. या वसाहतीमधील निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी अपेक्षित खर्चाच्या दोन टक्के रक्कम जीआरपी पोलिस विभागाने भरावी, असे पत्र रेल्वे प्रशासनाने जीआरपीला दिले होते. मात्र गेल्या तीन वर्षांच्या काळात याबाबत निर्णय झाल्याने वसाहतीचे नूतनीकरण रखडले आहे.

निवासस्थानांच्या भितींना पडल्या भेगा
या वसाहतीत 42 पोलिस कर्मचार्‍यांसाठी तर चार अधिकारी निवासस्थानांची सुविधा आहे. कधीकाळी अत्यंत देखणी असलेल्या या वसाहतीला सध्या उतरती कळा लागली आहे. वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडुपे उगवली आहे. तर निवासस्थानांच्या भिंती पडाऊ झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भिंतींना भेगा पडल्या आहेत. तर सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी निर्माण झाली असून डासांचा उपद्रव वाढला आहे.

69 लाख रूपयांचा खर्चाचा अंदाज
जीआरपी पोलिस वसाहतीमधील निवासस्थानांच्या दुरूस्तीबाबत जीआरपीने रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला होता. मात्र, दुरूस्तीसाठी लागणार्‍या अपेक्षित खर्चाच्या दोन टक्के रक्कम जीआरपीने भरावी. तरच निवासस्थानांच्या दुरुस्तीला सुरुवात होईल, असे पत्र रेल्वेने जीआरपीला दिले होते. 2013-14 मध्ये जीआरपीने रेल्वे प्रशासनाला दुरूस्तीसाठी दिलेल्या प्रस्तावावर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी वसाहतीची पाहणी करून 69 लाख रूपयांचा खर्चाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार जीआरपी प्रशासनाने सुमारे लाख 68 हजार रूपयांचा निधी रेल्वेकडे जमा केल्यास वसाहतीची दुरूस्ती होईल.

झाडे झुडपे वाढली
जीआरपीने हा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला. याबाबत वरीष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. जीआरपीपोलिसांची वसाहत शहरात अत्यंत मोक्याच्या जागी आहे. या वसाहतीपासून रेल्वेस्थानक, बसस्थानक, नामांकित शाळा-महाविद्यालये जवळ आहेत. त्यामुळे जीर्ण निवस्थाने असूनदेखील पोलिस कर्मचारी कुटुंबासह या ठिकाणी राहत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी जीआरपीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. जीआरपी वसाहतीतील निवासस्थानांच्या परिसरात अशाप्रकारे झुडुपे वाढली असून पडझड झाली आहे.