कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील उमेश नगर येथील विश्रामस्मृती इमारतीमध्ये राहणार्या 70 वर्षीय महिलेला शुक्रवारी सकाळच्या सुमारास अज्ञात इसमाने फोन केला. या इसमाने आपण कॅनरा बँकेतून बोलत असून तुमचे डेबिट कार्ड आधार कार्ड लिंक करायचे आहे अन्यथा जीएसटी भरावा लागेल, असे सांगत घाबरवून त्यांच्याकडून एटीएम कार्ड नंबर घेतला. काही क्षणातच या महिलेला आपल्या बँक खात्यातून ऑनलाइनच्या माध्यमातून 39 हजार 989 रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.