नवी दिल्ली । वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीचे भारताच्या स्वातंत्र्याप्रमाणे मध्यरात्री स्वागत करण्यात येणार आहे. 30 जून रोजी रात्री यासाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 1 जुलैपासून सुरू होणार्या जीएसटीची घोषणा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे करणार असल्याची माहिती आज केंद्रीय वित्त मंत्री अरूण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली. केरळ व जम्मू-काश्मिरचा अपवाद वगळता देशातल्या सर्व राज्यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला असून केरळमध्ये लवकरच याला मान्यता मिळणार असल्याची माहिती देत त्यांनी या पत्रकार परिषदेत जीएसटी लागू करण्यासाठी आयोजित करण्यात येणार्या कार्यक्रमासह विविध बाबींचा उहापोह केला.
मध्यरात्री विशेष कार्यक्रम
वस्तू व सेवा कर हा देशाच्या आर्थिक इतिहासातील महत्वाचा टप्पा ठरणार असल्यामुळे या क्रांतीकारी निर्णयाचे त्याच तोलामोलाने स्वागत करण्याची जय्यत तयारी केंद्र सरकारने केली आहे. ज्या पध्दतीने 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. अगदी त्याच पध्दतीने 30 जून रोजी मध्यरात्री जीएसटी लागू करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. यासाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संसदेचे विशेष सत्र बोलावण्यात आले आहे. याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व वित्तमंत्री अरूण जेटली हे संबोधीत करतील. याप्रसंगी व्यासपीठावर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच.डी देवेगौडा यांचीही उपस्थिती असेल. तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे जीएसटी लागू झाल्याची घोषणा करणार असल्याची माहिती अरूण जेटली यांनी दिली. याप्रसंगी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसह जीएसटी काऊन्सीलचे सदस्य उपस्थित राहतील. तर जीएसटीची माहिती देणारे दोन लघुपटही याप्रसंगी दाखविण्यात येणार असल्याची माहिती जेटली यांनी दिली.
ऐतिहासिक पुनरावृत्ती
देशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे 70 वर्षांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मध्यरात्री विशेष सत्र घेण्यात येत आहे. याआधी 14 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली मध्यरात्री संसदेचे सत्र बोलावण्यात आले होते. तेव्हा राष्ट्रगानानंतर मध्यरात्री स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर डॉ. प्रसाद यांचे भाषण झाले. यानंतर पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी अत्यंत गाजलेले ‘नियतीशी करार’ हे भाषण केले होते. याच ऐतिहासिक कार्यक्रमाची आता सात दशकानंतर पुनरावृत्ती होणार आहे.
65 लाख व्यावसायिकांची नोंदणी
वित्तमंत्री अरूण जेटली यांनी जीएसटी हा देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, मोठ्या, मध्यम व लहान व्यावसायिकांना जीएसटीच्या पुर्वतयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला आहे. आजवर देशभरातील सुमारे 65 लाख व्यावसायिकांनी जीएसटीसाठी नोंदणी केली असून हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. देशातील नागरिकांनी एकसमान कर प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यातून उद्योग-व्यवसायाला चालना मिळून सरकारचे उत्पन्नदेखील वाढणार असल्याचा दावा जेटली यांनी केला. तर व्यावसायिकांना जीएसटीसाठी दरमहा तीन ऑनलाईन विवरणपत्रे भरणे अनिवार्य राहणार असून यात हयगय करणार्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील त्यांनी दिला.
महानायक बनणार ब्रँड अँबेसेडर
वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीचे ब्रँड अँबेसेडर म्हणून महानायक अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय उत्पादन व सेवा शुल्क विभागाने ही निवड केली आहे. जीएसटीच्या प्रचार-प्रसारासाठी ते काम करतील. याच्या पहिल्या टप्प्यात 40 सेकंदाच्या एका जाहिरातीचे चित्रीकरणदेखील करण्यात आले असून लवकरच ती प्रसिध्द केली जाणार आहे. यासोबत जीएसटीच्या विविध पैलूंना जनतेसमोर परिणामकारकतेने मांडण्यासाठी व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू ही आधी जीएसटीची ब्रँड अँबेसेडर होती. तथापि, ही प्रणाली लागू होत असतांना याच्या प्रचारासाठी अमिताभ यांची निवड करण्यात आली आहे.