जीएसटीचे विवरणपत्र सादर न केल्यास दंड

0

व्यवसाय झाला नाही तरी ‘शून्य परतावा’ बंधनकारक

पिंपरी-चिंचवड : ज्यांनी ‘जीएसटी नोंदणी’ केली आहे अशा सर्वांना विवरणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. विवरणपत्र सादर न करणार्‍यास प्रतिदिन दंड आकारण्यात येणार असल्याचे वस्तू, सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे. जीएसटीबाबत परतावा मिळविण्यासाठी विहित नमुन्यातील विवरणपत्र जीएसटी कार्यालयाकडे ऑनलाइन किंवा प्रत्यक्षपणे सादर करणे अनिवार्य आहे. ज्यांची नोंदणी झाली आणि व्यवसाय मात्र झाला नाही, अशा व्यावसायिकांनीदेखील ‘शून्य परतावा’ विवरणपत्र दाखल करणे गरजेचे आहे.

31 मार्च अंतिम मुदत
यासंदर्भात सरत्या आर्थिक वर्षाच्या उर्वरित दिवसांसाठी व्यावसायिकांना विवरपत्र सादर करून त्यांना परतावा मिळवून देण्यासाठी वस्तू, सेवाकर व उत्पादन शुल्क विभागाचे विशेष अभियान सुरू आहे. या विभागाशी संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. जीएसटीचा परतावा मिळविण्यासाठी 31 मार्च ही अखेरची मुदत असल्याने व्यावसायिकांना यासंदर्भातील विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या सूचना
विवरणपत्र कोणी सादर करावे : जीएसटी नोंदणी असणार्‍या प्रत्येक व्यावसायिकाने
नोंदणी असल्यास व व्यवसाय नसल्यास? : ‘शून्य परतावा’ विवरणपत्र सादर करावे
परतावा विवरणपत्र सादर केले नाही तर? :ऑनलाइन प्रक्रियेतील छाननीत लक्षात येणार आणि संबंधित व्यावसायिकास प्रतिदिन दंड होणार
विवरणपत्र केव्हा सादर करावे?: 1 कोटीच्या आत व्यवसाय असल्यास दर तीन महिन्यांनी व 1 कोटींच्या आत व्यवसाय असल्यास दर तीन महिन्यांनी व 1 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय असल्यास दर महिन्यास परतावा विवरणपत्र दाखल करणे गरजेचे.
विशेष अभियान काय ?: ज्या व्यवसायिकांनी जुलैपासून जीएसटी परतावा विवरण सादर केले नाही व जे परताव्यापासून वंचित आहेत, त्यांनी 31 मार्चपूर्वी विवरणपत्र दाखल केल्यास तत्काळ परतावा मिळणार आहे. यासाठी काही कर्मचारी व अधिकारी यांना कार्यालयाने नियुक्त केले आहे. अधिक माहितीसाठी 02027655746 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.