जीएसटीत कपात, 177 वस्तू स्वस्त!

0

गुवाहाटी : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेची 23 वी बैठक अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आणि 24 राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी गुवाहाटी येथे आयोजि करण्यात आली होती. याबैठकीत रोजच्या वापरातील अनेक वस्तूंवरील 28 टक्के जीएसटी कमी करून तो 18 टक्के करण्यात आला. याबैठकीला उपस्थित असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी म्हणाले, यापुर्वी जीएसटी कर रचनेनुसार 28 टक्के कर असलेल्या 227 वस्तूंपैकी 177 वस्तूंवर आता 18 टक्केच जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे आता 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये फक्त 50 वस्तूच आहेत. च्युइंगम, चॉकलेट, सौंदर्य प्रसाधन, शेव्हिंग-आफ्टर शेव्ह, शॅम्पू, डिओड्रंट, वॉशिंग पावडर, ग्रेनाइट-मार्बल आदी वस्तूंचा यात समावेश आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर या नव्या करप्रणालीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला.

50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम
आसामच्या गुवहाटी येथे सुरु असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पेण्टस, सिमेंट पुन्हा 28 टक्के स्लॅबमध्ये आणण्यात आले आहे. वॉशिंग मशिन, एअर कंडिशनर्सवर सुद्धा आता 28 टक्के जीएसटी लावला जाणार आहे. या बदलामुळे चालू आर्थिक वर्षात 20 हजार कोटी रूपयांचा कर जमा होणार आहे. गुवाहाटी येथे झालेल्या याबैठकीत रेस्टॉरन्टमधील पदार्थांवरील जीएसटीतही कपात करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच छोट्या आणि मध्यम उद्योगांना दिलासा देण्यात येणार आहे. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर 28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.

एसी हॉटेलसाठी 12 टक्के दराची मागणी
1 जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टॅक्स स्लॅब जीएसटीमध्ये आहेत. जुलै महिन्यात हा कर लागू झाल्यानंतर 227 वस्तू 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आहेत. ग्रेनाईट, दाढीचे सामान, सौंदर्य प्रसाधन, मार्बल, चॉकलेट, च्युविंग गम, शेव्हींग क्रिम आणखी स्वस्त होणार आहे. एसी हॉटेलमध्ये बसल्यानंतर लागणारा 18 टक्के जीएसटी 12 टक्के करण्याची शिफारस मंत्रिगटाने केली आहे.

हॉटेलमध्ये खानपान स्वस्त
जीएसटी परिषदेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार हॉटेलमध्ये खानपान आता आणखी स्वस्त झाले आहे. यापुढे हॉटेलमधल्या बिलावर फक्त पाच टक्के जीएसटी आकारण्यात येईल. 15 नोव्हेंबरपासून हे नवीन दर लागू होतील. हॉटेल एसी असो वा नॉन एसी फक्त पाच टक्केच जीएसटी आकारण्यात येईल. यापूर्वी नॉन एसी हॉटेलमध्ये 12 टक्के आणि एसी हॉटेलमध्ये 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. एखाद्या हॉटेलमध्ये एसी आणि नॉन एसी अशी व्यवस्था असताना तुम्ही नॉन एसीमध्ये काही खाल्ल तरी 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. ज्या हॉटेल्समध्ये रुमचे भाडे 7500 रुपयांपेक्षा जास्त आहे त्या हॉटेल्समध्ये 18 टक्केच जीएसटी आकारण्यात येईल.