राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
शिमला : हिमाचलमधील पर्यटनाला 2000 कोटींचा फटका बसला आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे हिमाचलचीही वाईट अवस्था आहे. जीएसटीने व्यापार बुडवला आहे. केंद्रात काँग्रेस सरकार सत्तेत आली की सर्वात आधी जीएसटीमध्ये बदल करू, असे आश्वासन काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी दिले. सोमवारी ते विधानसभा निवडणूक प्रचारदौर्यासाठी हिमाचलमध्ये होते. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, खा. राज बब्बर आणि सलमान खुर्शीदही होते. काँग्रेसने वीरभद्र सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. हिमाचल विधानसभेसाठी 9 नोव्हेंबरला मतदान होणार असून, निकाल 18 डिसेंबरला लागणार आहेत.
सर्वात कमी भ्रष्टाचार हिमाचलमध्ये
या प्रचारदौर्यातील सभेत खासदार राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकारने 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचे वचन दिले होते. पण रोजगार तर लांबच राहिला उलट नोटाबंदी आणि जीएसटीद्वारे त्यांनी सर्वकाही कठीण करून ठेवले आहे. देशातील सर्वात कमी भ्रष्टाचार हिमाचल प्रदेशमध्ये आहे, हे सरकारच्याच नियोजन आयोगाने सांगितले आहे. शिक्षणात हिमाचल तिसर्या क्रमांकावर आहे. स्वच्छतेत पहिल्या तसेच हागणदारीमुक्त होणारेही पहिलेच राज्य असल्याचेही ते म्हणाले.
गुजरात-हिमाचलची तुलना
मोदींनी गुजरातला कंगाल केले आहे. तेथील शेतकर्यांची जमीन हिसकावून घेतली. हिमाचलमध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये आहेत, गुजरातमध्ये मात्र एकही नाही. हिमाचलमध्ये 1500 सरकारी शाळा आहेत तर गुजरातमध्ये 150 आहेत. हिमाचल प्रदेशातील एकही सरकारी शाळा बंद पडलेली नाही, गुजरातच्या मात्र 13 हजार शाळा बंद पडल्या आहेत, असा दावा राहुल यांनी केला.
…कामाची चिंता करू नका
गीतेत लिहिले आहे की, कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. पण मोदींनी याचा अर्थ असा काढला की, फळ सगळ्यांनी खाऊन टाका, कामाची चिंता करू नका. मोदी भ्रष्टचार संपवण्याच्या गप्पा मारतात. पण, अमित शाहांच्या मुलाबाबत तोंडातून एकही शब्द काढत नाहीत. शाह यांच्या मुलाची कंपनी 50 हजार कोटींहून 80 हजार कोटींपर्यंत कशी पोहोचली. मोदी म्हणायचे की, ते जनतेच्या पैशाचे चौकीदार आहेत, कोणाला काही खाऊ देणार नाही. पण तुम्ही चौकीदार नाही तर भागीदार आहात, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.