‘जीएसटी’मुळे उद्योगधंदे वाढीस

0

निगडी । देशभरात येत्या 1 एप्रिलपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) या नव्या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. जीएसटीमुळे सर्वच क्षेत्रातील 2 ते 5 टक्के दर कमी होणार आहेत. यामुळे उद्योगधंदे वाढीस लागतील, असे मत केंद्रीय उत्पादन व सेवाकर विभागाचे आयुक्त एन. श्रीधर यांनी व्यक्त केले. निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने ‘जीएसटी’ या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मधुकर हिरेगंगे, राजेश आडवाणी, शिव कुमार, सार्थक सक्सेना, पवन कुमार, सुहास गार्डी, बबन डांगले, प्रसाद सराफ, सुनील कारभारी, रवींद्र नेर्लीकर, आमोद भाटे, युवराज तावरे, प्राजक्ता चिंचोलकर, संतोष संचेती, अनिल अग्रवाल आणि सचिन बन्सल आदी उपस्थित होते.

आर्थिक विकासदर वाढेल
जनतेला स्वस्त किंमतीत उत्पादने मिळाल्याने आर्थिक विकास दर वाढण्यास मदत होईल; तसेच उद्योजक व व्यावसायिकांनी कर प्रणाली 31 मार्चपूर्वी जीएसटीमध्ये रुपांतर करून घ्यावी, जेणेकरून करून जीएसटीच्या सवलतीचा फायदा घेता येईल, असेही आवाहनदेखील एन. श्रीधर यांनी मार्गदर्शन करताना केले. याप्रसंगी मधुकर हिरेगंगे म्हणाले की, आज वस्तू खरेदीवर विविध कर द्यावे लागतात. ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर एकच कर द्यावा लागेल. लक्झरी, बेटींग, केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवाकर, व्हॅट असे 11 प्रकारचे कर द्यावे लागतात. उपायुक्त राजेश आडवाणी म्हणाले की, ‘एक राष्ट्र-एक कर’ पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या घोषणेनुसार जीएसटी लागू होत आहे. यामुळे खरेदी-विक्री वाढणार आहे. त्यामुळे देशाचे अर्थचक्र फिरत राहील. उत्पादन कंपन्या तेजीत असतील, रोजगार उपलब्ध होईल. यामुळे देशाचा आर्थिक विकास दर वाढेल, असा विश्वास आडवाणी यांनी व्यक्त केला. तर, प्रत्येक व्यावसायिकांनी जीएसटीचे पालन केल्यास उद्योगात अडथळे येणार नाहीत. यश आता जीएसटीवर अवलंबून असेल, असे सीए रवींद्र नेर्लीकर यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले.