जीएसटीमुळे करांचे प्रमाण कमी होणार

0

फैजपूर । जीएसटीमुळे विविध वस्तुंवरील करांचे प्रमाण कमी होईल. परिणामी वस्तू कमी किंमतीत मिळून ग्राहकांचा फायदा होईल. अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी माहिती विक्रीकर अधिकारी शैलेंद्र परदेशी यांनी दिली. सावद्यात झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

फैजपूर आणि सावदा शहरातील व्यापार्‍यांना जीएसटीबद्दल माहिती व्हावी यासाठी फैजपूर व्यापारी असोशिएशनतर्फे सावद्यातील स्वामीनारायण गुरुकुलमध्ये कार्यशाळा झाली.

पारदर्शी व्यवस्था म्हणजे जीएसटी
गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्तिकिशोरदास अध्यक्षस्थानी, तर विक्रीकर अधिकारी शैलेंद्र परदेशी, नीलेश प्रधान, शास्त्री भक्तिस्वरुपदास, फैजपूर व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष लेखराज बदलानी, व्यापारी युवराज नेमाडे आदी उपस्थित होते. दोन्ही शहरातील व्यापार्‍यांना मार्गदर्शन करताना विक्रीकर अधिकारी परदेशी यांनी, केंद्र राज्याच्या करप्रणातील एकसुत्रीपणा, करप्रणाली अधिक पारदर्शी करणारी व्यवस्था म्हणून जीएसटीकडे पाहावे. व्यापारी बांधवांना 20 लाखांपर्यत जीएसटी नंबर घेण्याची गरज नाही. सध्या देशात कर भरणार्‍यांचे प्रमाण कमी आहे. जीएसटीमुळे देशात महिन्याकाठी 300 कोटींच्या बिलांच्या एंट्री होऊ शकतील. तसेच करांचे प्रमाण कमी होऊन ग्राहकांना वस्तू कमी किमतीत मिळतील. परिणामी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे व्यापारी बांधवांनी 30 एप्रिलपर्यंत जीएसटी नंबर घेवून कर भरणा, रिटर्नची माहिती घ्यावी, असे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात शास्त्री भक्तिकिशोरदास यांनी, व्यापारी बांधवांनी शासनाच्या योजना आणि ग्राहकहित अशी सांगड घालण्याचे आवाहन केले.