जीएसटीमुळे कर प्रणालीत येणार सुसूत्रीपणा

0

फैजपुर । आपल्या उत्पन्नावर व विक्री झालेल्या व्यवहारावर कर भरावा लागणार आहे त्यासाठी जीएसटीच्या माध्यमामधुन कर प्रणालीत सुसूत्रीपणा यावा हे सरकारचे प्रयत्न आहे असे चार्टर्ड अकाऊंटंट सिदार्थ जैन यांनी सांगितले. धनाजी नाना महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग आणि वाणिज्य विद्या शाखा व फैजपुर व्यापारी मल्टीपर्पज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतातील वस्तु आणि सेवा कर (जीएसटी) आव्हाणे व वस्तुस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जैन बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक माजी आमदार शिरिष चौधरी होते.

लहान व्यावसायिकांना जीएसटी लागू नाही
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सिद्धार्थ जैन यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आधीच्या सर्व करांना एकत्रित करुन जीएसटी असे नाव दिले आहे. आधी जो कर होता आता ही तितकाच असल्याचे त्यांनी विश्लेषण करून सांगीतले तर 20 लाखापेक्षा कमीचे व्यवहार ज्या लहान व्यावसायिकांचे आहे त्यांना जीएसटी लागू नाही. दरम्यान कॉम्पोसिशन स्किममध्ये दुसर्‍या राज्यातील होणार्‍या व्यवहारावर समान कर लागणार याविषयी सुद्धा त्यांनी व्यावसाईकांना सखोल माहिती दिली. नवीन कायदा आहे येत्या दोन तीन महिन्यात सर्व सुरळीत होऊन व्यापारी वर्ग व ग्राहकांमध्ये असलेला जीएसटी संदर्भातील संभ्रम दूर होईल असेही त्यांनी मार्गदर्शनाअंती सांगितले.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, जळगाव रोटरी इस्टचे अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, मनिष पात्रीकर, दत्त ठिबकचे संचालक जितेंद्र पवार, संस्था उपाध्यक्ष एस.के. चौधरी, सचिव एम.टी. फिरके, व्हा. चेअरमन प्रा. के.आर. चौधरी, सदस्य प्रा. पी.एच. राणे, नंदकिशोर अग्रवाल, उपप्राचार्य ए.आय. भंगाळे, अर्थशास्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. एन.एल. चव्हाण, प्रा. राजेंद्र ठाकरे, प्रा.डॉ. जी.जी. कोल्हे आदी उपस्थित होते तर सुत्रसंचालन प्रा. सचिन भिडे यांनी तर आभार प्रा. केसूरे यांनी मानले.