उरुळी कांचन : जीएसटी देशाचे आर्थिक स्वावलंबन वाढविणारा असल्याने तो देशाबरोबरच व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांच्याही हिताचा आहे. ही करप्रणाली सुटसुटीत व पारदर्शक असल्यामुळे ती सर्वांच्या फायद्याची आहे. यामुळे सरकारचे उत्पन्न वाढून नजिकच्या भविष्यात प्राप्तिकर कमी होण्याची शक्यता आहे, असा विश्वास सनदी लेखापाल प्रतीक कर्पे यांनी व्यक्त केला.
पाक्षिक मनोगत व पुणे जिल्हा भाजप व्यापार आघाडीच्या वतीने उरुळी कांचन येथे आयोजित करण्यात आलेल्या जीएसटी मार्गदर्शन व संवाद परिषदेत ते बोलत होते. आमदार बाबूराव पाचर्णे आमदार संजय भेगडे, विनोद काकाणी, नामदेव ताकवणे, भुवनेश काकाणी, विकास जगताप बाळासाहेब गरुड, ज्ञानदेव चौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कर्पे म्हणाले की, आपल्या देशात यापूर्वी 17 प्रकारचे कर व त्यावरील वेगवेगळे सेस भरावे लागत. करावर कर आकारण्याच्या पद्धतीमुळे व्यापार्यांना त्रास होत होता. जीएसटीमुळे आता संपूर्ण देशात एकच कर झाला आहे. जगातील सुमारे 150 देशांमध्ये जीएसटी करप्रणाली आहे. कर परतावा मिळण्याची पद्धत सुटसुटीत करण्यात आली आहे. करावर कर आकारण्यात येणार नाही. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता नाही. व्यापार्यांना मिळणार्या करपरताव्याचा फायदा त्यांनी ग्राहकांपर्यंत पोहचविला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भ्रष्टाचार बंद होण्यासाठी पूर्ण करप्रक्रिया ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. अत्यंत सुटसुटीत व पारदर्शक पद्धत असल्याने व्यापार्यांनी त्यांचे हिशेब व्यवस्थित ठेवले तर त्यांना सीएच्या मदतीची गरजही भासणार नाही. जीएसटी माहिती देणारे ‘जीएसटी रेट’ नावाचे मोबाईल अॅप्लिकेशन शासनाने उपलब्ध करून दिले आहे. 75 लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल असणार्या व्यापार्यांना उलाढालीवर एक टक्का कर भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
आमदार पाचर्णे म्हणाले, जीएसटीमुळे भयभीत न होता, व्यापार्यांना आत्मविश्वासाने व्यापार करता यावा, यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल. जीएसटीमुळे जकात, विक्री कर यांसह अन्य सर्व कर आणि इन्स्पेक्टर राज संपुष्टात आले, ही मोठी समाधानाची बाब आहे.
तीन चाकी टेम्पोंमुळे अडथळा
पुणे, भवानी पेठ परिसरात श्री स्वामी समर्थ मंदिरा बाहेर ‘नो पार्किंग’चा फलक असून त्या ठिकाणी तीन चाकी टेम्पो उभे करण्यात येतात. समोरच गॅस एजन्सी असल्याने मोठ्या ट्रकमधून सिलेंडरच्या टाक्या उतरवल्या जातात. फळ्यांच्या हातगाड्याही येथे उभ्या असतात, तसेच मालवाहतूक करणार्या ट्रान्सपोर्टच्या गाड्यांमुळे येथे नेहमी वाहतूककोंडी होत असतो. त्याचा येथील रहिवाश्यांना नाहक त्रास होत असतो.
नवले रुग्णालयातील खुनाचे गुढ उकलले
नवले रुग्णालयात लिफ्टरूममध्ये मंगळवारी सकाळी आढळून आलेल्या एका अज्ञात पुरुषाच्या मृतदेहाचे गूढ उकलले असून त्याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासावरून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले रुग्णालयातील इमारतीचे काम आणि दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणी लिफ्टच्या डक्टमधून कुजल्याचा वास येत होता. म्हणून वॉचमनने पहिले असता एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अग्निशामक दल आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
गणेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी शीतल, दिलीप, लुकास, ख्रिस्तोपा आणि सुरेश जुगम या पाच जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी परमानंद उर्फ प्रेम संतराम गोंड (22 रा. नर्हे, मूळ.बिलासपूर) याने फिर्याद दिली आहे. नर्हे येथील नवले हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या जुन्या स्प्रिंगडेल शाळेच्या दुसर्या मजल्यावर परमानंद, आरोपी आणि गणेश हे 16 जुलैला दारू पीत बसले होते. त्यावेळी गणेश व आरोपींची बाचाबाची झाली. त्यामध्ये त्यांनी गणेशचा खून करून त्याला लिफ्टच्या रूममध्ये ढकलून दिले. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.