जीएसटीमुळे विडी उद्योग संकटात

0

सोलापूर । जीएसटीचा वाईट परिणाम विडी उद्योगावर होण्याची शक्यता आहे. विडी बनविण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालावर जीएसटी लागू होणार असल्यामुळे कामगारांवर बेरोजगाराची कुर्‍हाड कोसळण्याची भीती आहे. अगोदरच धूम्रपानविरोधी कायद्यामुळे विडी उद्योग संकटात असून आता या उद्योगाचे भवितव्य धोक्यात आले आहे. 17 रुपयांपर्यंत मिळणारा विडी कट्टा जीएसटीमुळे 25 रुपयांपर्यंत महागणार आहे.

99 टक्के महिला कामगार
सोलापुरात 15 लहान-मोठ्या विडी कारखान्यांतून 70 हजार कामगार विड्या बनविण्याचे काम करत असून त्यात 99 टक्के महिला कामगार आहेत. मुळात किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळणे दुर्लभ असले तरी केवळ अपरिहार्यतेमुळे केवळ 150 रुपये मजुरीवर विडी कामगार काम करतात. जीएसटी विडीच्या तंबाखू, तेंदू पत्ता आणि दोरा या कच्च्या मालावर जीएसटी लागू होणार आहे. तंबाखूवर 28 टक्के, तेंदू पत्त्यांवर 18 टक्के तर दोर्‍यावर 5 टक्के जीएसटी लागणार आहे. विडी पॅकिंगसाठी लागणारे रॅपर, लेबल, ब्रॅण्ड नेमचे कागद व बॉक्स पॅकिंग आदींवरही जीएसटी लागू आहे. विडी तयार झाल्यावर त्यावर 28 टक्के जीएसटी लागू होणार आहे.

कामगार कपातीची भीती
आधी धूम्रपानविरोधी कायद्यामुळे व त्यानंतर 500 व 100 रुपयांच्या नोटा अचानक बंद करण्याच्या निर्णयाचा फटका बसला विडी विक्रीसह उत्पादनावर परिणाम झाल्यास कामगार कपातीला पर्याय राहणार नाही. आतापर्यंत सुपात असलेला विडी उद्योग जीएसटीमुळे जात्यात आल्याची प्रतिक्रिया सोलापुरातील बाबळे-वाघिरे विडी कारखान्याचे व्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे यांनी दिली.