पाचोरा । भारताने एक देश एक कर ही अभिनव कर प्रणाली स्विकारली असुन या प्रणालीमुळे देशात एक व्यावसायिक क्रांती निर्माण झालेली आहे. देशातील सर्व व्यावसायिक, उद्योजक यांंना वेगवेगळे कर न भरता एकच कर भरावा लागणार आहे. यासाठी स्वत:ला शिस्त व सवय लावुन घेण्यासाठी काही प्रमाणात अवधी लागणार आहे, असे मत जळगाव येथील आयकर विभागाचे अधिक्षक विनय राऊत यांनी मांडले. यावेळी निर्मल सीड्स उद्योग समुहाचे ज्येष्ठ संचालक दिलीपराव देशमुख, चाळीसगांव विभागाचे सुप्रीटेंडन्ट डी.सी.सैतवाल, निर्मल सीड्सचे व्यवस्थापक एस.एस.पाटील, सहाय्यक व्यवस्थापक जी.एम.पाटील, पी.ए.दळवी, आय.एस.हलकुडे, प्रशात चराया, रवि चौरपगार उपस्थित होते.
विविध उदाहरणांसह दिले स्पष्टीकरण
पाचोरा येथील निर्मल सीड्स प्रा.लि. व कर विभाग जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने वस्तु व सेवा कर (जीएसटी) मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरास मार्गदर्शन करतांना अधिक्षक राऊत यांनी सांगितले की, विविध कर भरणारे व्यावसायिक, उद्योजकांनी सर्व्हिस टक्स, एक्साईज, व्हट असे वेगवेगळे कर भरण्याची गरज नसुन केवळ जीएसटी हा एकच कर भयावा लागणार आहे. यामुळे प्रथम दर्शनी जीएसटी प्रणाली कठीण स्वरुपाची वाटत असली तरी या प्रणालीचा सखोल अभ्यास केल्यास प्रत्येकाला चांगली सवय लागुन सर्व सामान्य जनतेस ही आपण खरेदी करत असलेल्या लस्तुवर किती जीएसटी लागत आहे याची माहिती अवगत होईल, राज्यातल्या राज्यात व एका राज्यातुन दुसर्या राज्यात वस्तुंची देवाणघेवाण होत असतांना त्यावर आकारलेल्या जीएसटीमुळे त्या राज्याचे उत्पन्न वाढुन राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे. यावेळी प्रंशात चराया यांनी जीएसटी रिटर्न भरण्यासंदर्भात सखोल माहिती दिली. शिबीराचे सुत्रसंचालन रवि चौरपगार तर आभार डी.एस.सैतवाल यांनी मानले. शिबीरास नितीन पाटील, किशोर अग्रवाल यांचेसह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.