‘जीएसटी’मुळे व्यापारात येणार पारदर्शकता

0

जळगाव । देशात जीएसटीलागू व्हावा यासाठी गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकार वेळोवेळी बैठक घेवून चर्चा करण्यात आली. ’गुड सर्व्हिस टॅक्स हा गुड सिंपल टॅक्स व्हावा’ अशी संकल्पना घेवून हा निर्णय घेण्यात आला असून या जीएसटीमुळे देशातील विकासात मोठी भर पडणार असून व्यापार करतांना कोणीही कराची चोरी करता येणार नाही, त्यामुळे जीएसटीच्या कारभारात संपुर्ण पारदर्शकता दिसून येणार आहे. व्यापार्‍यांना काळानूरूप जावून स्वतःला बदल करावा लागणार आहे. याचा फायदा ग्रामीण भाग व ग्राहकांना नक्की होणार असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्य मंत्री ना. सुभाष भामरे यांनी केले. बुधवार 12 जुलै रोजी सांयकाळी 6.30 वाजता जिल्हा नियोजन भवनात जीएसटी संदर्भात व्यापार्‍यांना मार्गदर्शन करत त्यांचे शंकाचे निसारण करण्यात आले. यावेळी या बैठकीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नाशिक येथील अमोल काटे, डॉ. पी.के.राऊत, एस.पी.सिंग, आर.पी.शर्मा यांच्यासह शहरातील व्यापारी संघटनेचे प्रमुख उपस्थित होते.

माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी
पुढे बोलतांना म्हणाले की, या आगोदर देशात व राज्यात कर संदर्भातील विविध नियम व प्रत्येक राज्याचा कर हा वेगवेगळा पद्धतीचा होता. त्यामुळे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणार्‍या मालाला कमी अधिक प्रमाणावर कर लागत होता. मात्र आता 1 जुलै पासून जीएसटी लागू केल्यामुळे संपुर्ण भारतात एकच पद्धतीने कर लावल्यामुळे पारदर्शकता येणार आहे. जीएसटी लागू झाल्यामुळे देशाच्या विकासात मोठ्या प्रमाणावर होणार असून पंतप्रधान यांनी माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. जवान हा देशाचा सिमेवर पहारा देवून देशाचे संरक्षण करतो. मात्र देशांतर्गत असलेल्या शत्रुला (काळा पैसा जमविणार्‍या) या जीएसटीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. जीएसटीमुळे अनेकांना अडचणी येत असतील ते मान्य असून त्यावर लवकरच उपाय योजना करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासन कुठल्याही प्रकारे तडजोड करणार नाही. असेही संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.भामरे यांनी स्पष्ट केले.