मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वस्तु सेवा कर लागू झाल्यानंतर सरकारकडे अतिरीक्त 44 लाख रुपये जमा केले आहेत. बीसीसीआयने शनिवारी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीत, त्यांनी जुलै महिन्यात जीएसटीसाठी 44 लाख 29, 516 रुपये जमा केले आहेत असे म्हटले आहे. याशिवाय मंडळाने इतर देण्यांची माहितीही खुली केली आहे.
इतर माहितीमध्ये मंडळाने संघातील खेळाडू, सहयोगी स्टाफ, विविध क्रिकेट संघटना आणि कंपन्याना दिलेल्या रकमेचा हिशोब दिला आहे. संघातील खेळाडूंमध्ये अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीला 92 लाख 46,412 रुपये, ऑफ स्पिनर हरभजनसिंगला 62 लाख 52,871 रुपये, डावखूरा फिरकी गोलंदाज अक्शर पटेलला 37.51 लाख रुपये आणि वेगवान गोलंदाज उमेश यादवला 34.79 लाख रुपये दिले असल्याचे या संकेतस्थळावर म्हटले आहे.
वरिष्ठ संघाचे फिजीयो पॅट्रिक फरहार्ट यांना पाच महिन्यांचे मानधन म्हणून 58 लाख 87,139 रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय ओदिशा क्रिकेट संघटनेला भारत आणि इंग्लंड याच्यातील एकदिवसीय सामन्याच्या आयोजनापोटी 37 लाख रुपये आणि विदर्भ क्रिकेट संघटनेला 19 वर्षाखालील भारत आणि इंग्लंड यांच्यातील दोन अनधिकृत कसोटी सामन्याच्या आयोजनापोटी 56 लाख रुपये देण्यात आले आहेत.