पी चिदंबरम यांनी भाजपला काढला चिमटा
नवी दिल्ली : शुक्रवारी गुवाहाटी येथे अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत तब्बल 200हून अधिक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाचे श्रेय माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीला देत गुजरातचे आभार मानले आहेत. थँक्यू गुजरात असे ट्विट करत चिदंबरम यांनी केंद्र सरकारला चिमटा काढला आहे. गुजरात निवडणुकीत फटका बसेल या भितीनेच भाजपने हा निर्णय घेतल्याचे चिदंबरम यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले आहे.
काँग्रेसची पुढची लढाई समानदरासाठी
गुवाहाटी येथील जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर 211 वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल विरोधकांनी मोदी सरकारचे अभिनंदन करण्याऐवजी गुजरातचे आभार मानले आहेत. गुजरातला धन्यवाद! जे संसदेला जमले नाही. जे कॉमन सेन्सने होऊ शकले नाही, ते गुजरातच्या निवडणुकीने करून दाखवले. जीएसटी 18 टक्क्यांपर्यंत मर्यादित असावा, अशी काँग्रेसची सुरुवातीपासून भूमिका होती. शेवटी तीच मान्य झाली. माझे म्हणणे खरे ठरले. उशिरा का होईना सरकारला समज येऊ लागली आहे. काँग्रेसची पुढची लढाई समानदरासाठी असेल, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
जीएसटीमध्ये एक रेट असावा
राहुल गांधी उत्तर गुजरातच्या तीन दिवसांच्या निवडणूक दौर्यावर आहेत. प्रचारदौर्यात राहुल गांधींनी म्हणाले, भाजप सरकारने जीएसटीत बदल केले ही बाब स्वागतार्हच आहे. काँग्रेस आणि देशातील जनतेने टाकलेल्या दबावामुळेच सरकारने 178 उत्पादनांवरील जीएसटीचे प्रमाण 28 वरुन 18 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला. आम्ही अजूनही समाधानी नाही, आमचा लढा इथेच संपलेला नाही, भारताला जीएसटीत पाच टप्प्यांऐवजी एकच टप्पा हवा आहे. जीएसटीत अजूनही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. नोटाबंदी आणि गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी) या दोन निर्णयांनी देशातील लाखो तरुणांना बेरोजगार केले आहे.