डेहराडून : नोटाबंदी आणि जीएसटी कायद्यामुळे कर्जबाजारी झालो, असा दावा करत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणार्या एका 44 वर्षीय व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. डेहराडूनमध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे भाजप कार्यालयात मंत्र्यांनी भरवलेल्या जनता दरबारातच हे नाट्य घडल्याने खळबळ उडाली आहे.
डेहराडून येथील भाजपच्या कार्यालयात कृषी मंत्री सुबोध उनियाल यांनी जनता दरबार भरवला होता. या दरबारात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे 44 वर्षीय प्रकाश पांडेय हे उपस्थित होते. साधारण दीड वाजताच्या सुमारास पांडेय वृत्तवाहिन्यांच्या कॅमेर्यासमोर आले आणि त्यांनी मंत्री उनियाल यांच्यासमोरच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफी करावी, अशी विनंती मी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असे त्याने सांगितले.