जीएसटी : पुणे 137.30, पिंपरी-चिंचवड महापालिकेला 128.97 कोटींचे अनुदान

0

पुणे : देशभरात 1 जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील महापालिकांचा जकात आणि स्थानिक कर (एलबीटी) बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या 26 महापालिकांना जीएसटीचे अनुदान द्यावे लागणार आहे. पुणे महापालिकेला 137.30 कोटी तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला 128.97 कोटी अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्राने दिली.

1385.27 कोटींचे अनुदान जाहीर
जकात आणि एलबीटी बंद झाल्याने राज्यातील 26 महापालिकांना जीएसटीचे 1385 कोटी 27 लाख अनुदान जाहीर झाले आहे. यामध्ये मुंबई 647.34, ठाणे 59.30, नवी मुंबई 77.92, पुणे 137.30, पिंपरी-चिंचवड 128.97, नाशिक 73.40, नागपूर 42.44, कल्याण-डोंबिवली 19.92, उल्हासनगर 12.85, भिवंडी 18.10, वसई 27.06, मीरा-भाईंदर 19.51, जळगाव 8.78, नांदेड 5.68, सोलापूर 18.60, कोल्हापूर 10.35, अहमदनगर 7.12, औरंगाबाद 20.30, अमरावती 7.82, चंद्रपूर 4.49, परभणी 1.54, लातूर 1.25, सांगली 10.95, मालेगाव 11.68, धुळे 7.34 आणि अकोला महापालिकेला 5.29 इतके अनुदान जाहीर झाले आहे.

पहिला हप्ता महापालिकांना वितरित
दरम्यान, अनुदानाचा हा निधी 70 टक्क्यांच्या मर्यादेत आहे. यापूर्वी मुंबई वगळता सर्व महापालिकांना एलबीटीचे अनुदान देण्यात येत होते. मुंबईला पहिल्यांदाच अनुदान मिळत असून, याआधी याठिकाणी जकात होती, ती आता बंद झाली आहे. तसेच, नव्या पनवेल महापालिकेचा या यादीत समावेश नाही हे विशेष. दरम्यान, हा जीएसटीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे.