मंत्र्याच्या वक्तव्याने भाजपची कोंडी
नवी दिल्ली : जीएसटी अजून मलाच कळलेला नाही. मीच काय अगदी तज्ज्ञ असलेल्या सीएंना व व्यापार्यांनाही अजून जीएसटी नीट समजलेला नाही. जर, तज्ज्ञ मंडळींना जीएसटी समजलेला नसेल तर मला काय समजणार, त्यामुळे मी त्यावर बोलणे उचित नाही, असे वक्तव्य भाजपाचे मध्य प्रदेशातील आमदार ओमप्रकाश धुरवे यांनीच केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. काही काळ गेल्यानंतर नवीन कररचना लक्षात येईल, असेही ते म्हणाले. जीएसटीच्या क्लिष्टतेवरून भाजपवर अगोदरच टीका होत असताना आता मंत्र्यानेच असे वक्तव्य केल्याने भाजपची कोंडी झाली आहे.
विरोधकांचा क्लिष्टतेचा आरोप
जीएसटीची रचना चांगली नसून तो अत्यंत घाई घाईत लागू करण्यात आला अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याची टीकाही गांधी यांनी केली आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त घेतलेल्या सभेमध्ये गांधी यांनी जीएसटीवरही सडकून टीका केली. सरकारी अडथळे असलेला, क्लिष्ट असा जीएसटी असून त्यामुळे सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप गांधींनी केला आहे. आधुनिक जगातील हे लायसन्स राज असून सरकारी अधिकार्यांच्या हातात नको इतकी सत्ता जीएसटीमुळे गेल्याचा दावाही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर भाजपाच्याच आमदाराने जीएसटी क्लिष्ट असल्याचे व तज्ज्ञांनाही समजत नसल्याचे विधान केल्यामुळे हा भाजपाची कोंडी झाली आहे.