मुंबई:- व्यापाऱ्यांनी जीएसटीबाबत संभ्रम निर्माण केल्यामुळे मंदावलेली साखर विक्री जीएसटी लागू होताच वाढली आहे. जीएसटीच्या भितीमुळे 20 ते 29 जून या कालावधीमध्ये साखरेच्या मंदावलेल्या खरेदीने 1 जुलै रोजी जीएसटी लागू होताच जोर धरला आहे. बाजारात कुजबुज केल्यामुळे त्याचा व्यवसायावर परिणाम झाला होता. आता कमी झालेल्या खरेदी दरातही वाढ होत आहे.
देशभरात 1 जुलैपासुन जीएसटी लागु होणार असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कमी प्रमाणात साखर खरेदी केली होती. अनेक कारखान्यांतील साठा उचलला न गेल्यामुळे कारखानदार चिंतेत पडले होते. साखर पडुन राहणे कारखान्यांना परवडणार नसल्याचा फायदा घेऊन काही व्यापाऱ्यांनी कमी दरात साखर खरेदी केली होती. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून साखर खरेदी आणि विक्रीलाही जोर चढल्यामुळे आता खरेदी दरात वाढ झाली आहे. बाजारपेठेतील साखर खरेदी दरामध्ये ऑक्टोबर 2016 पासुन जवळपास 6.74 टक्के वाढ झाली आहे.
जागतिक साखर उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाल्यामुळे आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या दरात 32 टक्के घट झाली आहे. तर भारतात गत वर्षाच्या जवळपास 40 ते 49 टक्के लाख मेट्रीक टन साखर उत्पादन कमी झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार बाबर यांनी दिली. यंदा पाऊस समाधानकारक असून 9 लाख 3 हजार हेक्टर क्षेत्रातुन जवळपास सव्वासातशे लाख मेट्रीक टन उस उपलब्ध होईल. त्यामुळे 2017-18 या हंगामध्ये देशाच्या साखर उत्पादनात वाढ होईल. बेणे, गुऱ्हाळ व रसवंती इत्यादी ठिकाणी होणारा उस पुरवठा वजा जाता सर्वसाधारण 650 ते 665 लाख मेट्रीक टन उस गाळपाला उपलब्ध होईल. त्यामुळे राज्याचे गेल्या वर्षीच्या 30 लाख मेट्रीक टन साखर उत्पादन यंदा 72 लाख मेट्रीक टनपर्यंत पोहचेल, असा दावाही बाबर यांनी केला.