सांगली : केंद्र शासनाने शनिवारपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली असली तरी शनिवारी व रविवारी, पाहिले दोन दिवस संभ्रमामुळे सांगली शहरातील बाजारपेठ ठप्प होती. दराबाबतचा संभ्रम व नवीन करप्रणालीच्या तयारीसाठी दुचाकी, चारचाकी वाहने, सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंसह इतर व्यापाऱ्यांनी तीन दिवस मालाची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र शासनाने जम्मू व काश्मीर वगळता संपूर्ण देशभरात १ जुलै २०१७ पासून जीएसटी ही नवी करप्रणाली लागू केली आहे. सांगली जिल्ह्यात देखील ही करप्रणाली लागू झाली आहे. शनिवारी त्याचा पहिला दिवशी होता. मात्र सध्या जीएसटीबाबत परिपूर्ण अशी माहिती व्यापाऱ्यांना नाही. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी शनिवारी मालाची विक्री केली नाही. शहरातील दुचाकी, चारचाकी वाहने, सोने, इलेक्ट्रॉनिक्स दुकानासह इतर मोठ्या व्यापाऱ्यांनी शनिवारी आपला व्यवसाय बंद ठेवला होता. जीएसटी ही करप्रणाली संपूर्ण संगणकीय आहे. यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी नवीन प्रणाली अपडेट करण्याचे काम सुरू केले आहे. शिवाय कंपनीच्या किंमती अद्याप रिटेल विक्रेत्यांनी मिळाल्या नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांनी तीन दिवस मालाची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शनिवारी सांगली शहरातील उलाढाल ठप्प झाली आहे.