मुंबई । शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली. जीएसटी मंजूर करून घेण्यासाठी बोलावलेले 3 दिवसांचे विशेष अधिवेशन 5 दिवसांचे करा. अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे शिवसेनेचे रामदासभाई कदम यांनी सांगितले.
कर्जमाफी, अवकाळी पाऊस आणि गारपीट
दरम्यान, भाजपच्या इतर गटनेत्यांशी चर्चा करून याबाबत 2 दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सेना मंत्र्यांना दिले आहे. ‘कर्जमाफी करणं हा सर्वात पहिला विषय आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यांना शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे या सगळ्याच विषयांवर विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत. शेतकर्यांना न्याय देण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवावे अशी आम्ही मागणी केली आहे.’ अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
भाजप गट नेत्यांशी चर्चा करून निर्णय
‘दोन दिवस अधिवेशन आणखी घ्यावे. अशी मागणी शिवसेनेने आज मुख्यमंत्र्यांकडे केली. कुठल्याही परिस्थितीत शेतकर्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकर्यांसाठीच आपण इथे बसलेलो आहोत. मुख्यमंत्र्यांनी भाजप गट नेत्यांशी चर्चा करून निर्णय कळवतो असे आश्वासन दिले आहे.’ असं पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले.