जीएसटी सोहळ्यावर काँग्रेसचा बहिष्कार

0

नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 30 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात बोलावलेल्या विशेष बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने याबाबत एक पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या मध्यवर्ती सभागृहांत मध्यरात्री झालेले आतापर्यंतचे सर्व कार्यक्रम स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित होते, असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपवर टीका केली. त्यांचा स्वातंत्र्यलढ्यात कोणताही सहभाग नव्हता. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य आणि सेंट्रल हॉलचे महत्त्व कळणार नाही, असा टोला आझाद यांनी भाजपचा उल्लेख न करता लगावला.

देशात जमावाकडून होत असलेल्या हत्या, अल्पसंख्याक, दलित आणि महिलांवर होत असलेले अत्याचार यावरूनही यावेळी आझाद यांनी सरकारवर निशाणा साधला. देशात सध्या जे काही चालले आहे त्यावर आपले पंतप्रधान मौन बाळगून आहेत. भाजपचे केंद्रातील मंत्र, राज्यांचे मुख्यमंत्रीही सोयीस्कररित्या गप्प आहेत. भाजपच्या राज्यात नक्की चालले तरी काय?, असा सवालच आझाद यांनी केला. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, आनंद शर्मा आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित होते.