पुणे : वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर पुण्यातील बहुसंख्य हॉटेलमालकांनी दर वाढवून नफेखोरी चालविली आहे. याविरोधात भाजपचे खासदार, पालकमंत्री कोणती भूमिका घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. भाजपला कदाचित यात संघर्षही करावा लागेल. दरम्यान, हॉटेलचालकांच्या या वारेमाप दरवाढीबद्दल पुणेकरांनी सोशल मीडियावर मात्र जोरदार संताप व्यक्त केला.
पालकमंत्री, आमदारांनी लक्ष घालावे….
हॉटेलमालकांनी विनाकारण दरवाढ केली आहे. यामध्ये ग्राहकांची लूट आहेच; शिवाय नाफेखोरीचाही प्रकार चालू आहे. याबद्दल जीएसटी कार्यालय, ग्राहक पंचायत याकडे रीतसर तक्रार नोंदविणार असल्याचे भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना सांगितले. पालकमंत्री गिरीश बापट यांनाही ते निवेदन देणार आहेत. पुण्यातील नामांकित हॉटेलपासून अगदी टपरीपर्यंत दरवाढीचे सत्र सुरु झाले आहे. जीएसटी लागू झाल्यावर एका हॉटेलमालकाने इडलीचे दर 50 रुपयांवरून एकदम 60 रुपये केले. एकदम 20 टक्के दरवाढ कशी झाली? याचे ग्राहकांना आश्चर्य वाटले. इडलीसाठी प्रसिद्ध असलेल्या त्या हॉटेलचे रेटकार्ड रातोरात सोशल मीडियावर फिरू लागले. त्यापाठोपाठ अनेक हॉटेलमध्ये नवी रेटकार्ड आली आणि त्यात जीएसटी लागू झाल्याने दरवाढ केल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे ग्राहकही बुचकळ्यात पडले आहेत.
संबंधित हॉटेलवर बहिष्कार टाका!
साधारण हॉटेल्समध्ये पदार्थांच्या दरात वाढ होण्याचे काही कारण नाही असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे, आता खुलासा करण्याची जबाबदारी अर्थातच भाजपची आहे. हॉटेलमधील दरवाढीने पुणेकर संतप्त आहेत. नोकरदार, छोटे व्यावसायिक यांच्यादृष्टीने हॉटेलिंग अनिवार्य आहे. हल्ली कामाच्या निमित्ताने नोकरदारवर्ग 10-12 तास घराबाहेर असतो, त्याला एकदा तरी हॉटेलमध्ये जावेच लागते. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरवाढ केलेल्या हॉटेलवर बहिष्कार टाका असे आवाहन जागरूक पुणेकरांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे. हॉटेलमध्ये-रेस्टॉरंटमध्ये 30 जूनपर्यंत आकारल्या जाणार्या पदार्थांच्या किंमती या व्हॅट आणि सेवाकर धरून होत्या. 1 जुलैपासून त्यातला सेवाकर आणि व्हॅट हा घटक कमी होऊन जीएसटी वाढायला पाहिजे होता; पण हॉटेल- रेस्टॉरंटवाल्यांनी 30 जूनच्या करासहित किंमतीच्यावर जीएसटी आकारायला सुरुवात केली आहे. ग्राहकांच्या खिशावर 22 टक्के बोजा वाढविला आहे. एकप्रकारे ही मंडळी जीएसटी फेल करू पाहात आहेत, याकरिता त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे आवाहन करणारे मेसेज फिरत आहेत. यापुढे अन्य क्षेत्रातही भाववाढ दिसू लागेल असे संकेत जाणकार मंडळी देऊ लागली आहेत. भाजपसाठी ही परिस्थिती आव्हानाची ठरणारी म्हणावी लागेल.