देशाच्या फाळणीचे षडयंत्र ज्या वास्तूत रचले गेले; ती ‘जीना हाऊस‘ ही ऐतिहासिक वास्तू पाडून टाकण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष तथा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आणि या प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा नवा संघर्ष निर्माण झाला. इतिहासाची काळी निशाणी असलेली ही वास्तू पाडून तेथे सांस्कृतिक केंद्र निर्माण करण्यात यावे, अशी आ. लोढा यांची मागणी आहे. मुंबईतील उच्चभ्रू मलाबार हिल परिसरात ही वादग्रस्त वास्तू असून, या भागाचे प्रतिनिधीत्व लोढा हे करतात. तब्बल अडीच एकर परिसरात वसलेली ही इमारत युरोपियन बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल. 1936 मध्ये या देखण्या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले होते. बॅरिस्टर मोहम्मद अली जीना हे जेमतेम दहा ते अकरा वर्षे या वास्तूत रहात होते. देशाच्या फाळणीनंतर त्यांनी ही इमारत सोडून पाकिस्तान गाठले. या वास्तूत कुणी युरोपियनच रहावे, अशी जीना यांची ही वास्तू सोडताना इच्छा होती. वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत युरोपियन व्यक्तीच्या ताब्यात राहिली तरच तिची योग्य देखभाल होऊ शकेल, असेही जीना यांना वाटत होते. त्यामुळे पुढे भारत सरकारने ही इमारत ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिश उच्चायुक्तांना ती भाडेतत्त्वावर निवासासाठी दिली होती. साडेतीन दशके ही इमारत ब्रिटिश दुतावासाकडे राहिल्यानंतर गेल्या काही दशकांपासून ती खालीच आहे. काही वर्षांपूर्वी इमारतीचा एक भाग भारतीय सांस्कृतिक परिषदेला कार्यालयीन वापरासाठी देण्यात आला होता. त्यानंतर या इमारतीचे सांस्कृतिक भवनात रुपांतर करण्यात यावे, यासाठीची मागणी पुढे आली. 2005 मध्ये तत्कालीन परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री ई. अहमद यांनी हा प्रस्ताव मांडला होता. परंतु, त्यावेळच्या केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलेे. जीना हाऊस पाडून टाकण्याबाबत केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार तूर्त अनुकूल असावे, असे वाटते. परंतु, त्याला आता पाकिस्तानने विरोध केल्यानंतर हा प्रश्न चर्चेचा मुद्दा बनला आहे. ज्या आ. लोढा यांनी जीना हाऊस पाडण्याची मागणी केली ते आ. लोढा हे भाजपचे वजनदार नेते आहेत. दुसरे म्हणजे ते प्रभावशाली उद्योगपती आहेत आणि तिसरे म्हणजे राज्य व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने त्यांचा शब्द या दोन्ही सरकार दरबारी चांगलाच चालतो. मुंबईत येऊन आमदार झालेले लोढा यापूर्वी जोधपूर येथील न्यायालयात वकिली करत होते. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि नंतर लोकसभेचे खासदार राहिलेले स्व. गुमानमल लोढा यांचे ते सुपूत्र आहेत. शिवाय, मुंबईतील मोठे बिल्डर आणि समाजसेवक म्हणूनही आ. लोढा यांची ख्याती आहे. प्रदीर्घ काळापासून जनसंघ आणि भाजपशी जुळलेले असल्याने लोढा यांच्या मनात जीना हाऊसबद्दल द्वेष असणे सहाजिक आहे. परंतु, जीना हाऊस पाडून इतिहासाच्या काळ्याकुट्ट आठवणी पुसता येणार नाहीत, हे त्यांना कोण सांगेल? जीना हाऊस पाडून टाकले म्हणजे फाळणीची सच्चाई नष्ट करता येईल का? भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचे षडयंत्र या वास्तूत रचले गेले यात त्या वास्तूचा दोष नाही. ज्याने ते षडयंत्र रचले ते जीना तर ही वास्तू येथेच सोडून गेले होते. त्यामुळे ही वास्तू भारताचीच ऐतिहासिक ठेवा आहे. पाकिस्तानची शेवटची आठवण आहे. त्यामुळेच ती पाडून टाकण्यापेक्षा तिचे जतन करणे ही काळाची गरज आहे.
हे सत्य आहे, की सप्टेंबर 1944 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी व मो. अली जीना यांच्यात भारत-पाकिस्तानच्या फाळणीबाबत चर्चा झाली होती. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी बरोबर एक वर्षआधी 15 ऑगस्ट 1946 रोजी याच विषयावर दुसर्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू व जीना यांच्यात चर्चा झाली होती. या दोन्ही चर्चा याच जीना हाऊसमध्ये झाल्या होत्या. परंतु, या चर्चांना षडयंत्राचे नाव द्यायचे आणि त्याच आधारे ही इमारत उद्ध्वस्त करण्याची मागणी करायची हे संयुक्तिक ठरणारे नाही. गांधी-जीना आणि नेहरू-जीना यांच्यातील चर्चांना षडयंत्र कोणत्या आधारावर म्हणावे? कालपर्यंत जीना हाऊसचे रुपांतर सांस्कृतिक वारशात व्हावे, अशी मागणी होत होती. परंतु, अचानक ते उद्ध्वस्त करण्याची मागणी होत असेल तर मात्र यामागे नक्कीच काही तरी काळेबेरे आहे. काही तरी रणनीती भाजप सरकारच्या डोक्यात घोळत असावी आणि आ. लोढा हे त्यासाठी निव्वळ निमित्त मात्र असावेत. मुळात जीना हाऊस हे रा. स्व. संघाच्या नेहमीच डोळ्यात सलत आलेले आहे. ही वास्तू पाहिली की संघाच्या लोकांना फाळणीच्या जखमा ताज्या होतात. त्यामुळे ही वास्तू मुळासकट पाडून टाकली तरच त्यांचे तडफडते आत्मे शांत होतील. ज्या वास्तूंबद्दल अत्याधिक वाईट आठवणी आहेत, अशा अनेक वास्तू भारतात आहेत. तशाच त्या पाकिस्तान अन् बांगलादेशातही आहेत. महात्मा गांधी हे जसे भारताचे राष्ट्रपिता आहेत, आणि त्यांच्या आठवणीतील वास्तू व वस्तू जशा आपल्याला प्राणप्रिय आहेत, तशीच काहीसी मानसिकता पाकिस्तानचीदेखील आहे. मोहम्मद अली जीना हे त्या राष्ट्राचे कायदे आझम-राष्ट्रपिताच आहेत. त्यामुळे जीना हाऊस ही त्यांची मोठी आत्मियता राहिलेली आहे. ही वास्तू भारताने उद्ध्वस्त करू नये तर ती पाकिस्तानच्या ताब्यात द्यावी, अशी पाकिस्तानची मागणी आहे. कारण, ती कोट्यवधी पाकिस्तानींच्या आत्मसन्मानाशी निगडित बाब आहे. ही वास्तू पाकिस्तानचा आत्मसन्मान असली तरी ती भारताच्या इतिहासाशी जुळलेली आहे हेदेखील विसरून चालणार नाही. ऐतिहासिक वास्तू नष्ट करून इतिहास बदलता येणार नाही; हे समजण्याइतपत भारतीय जनता नक्कीच दुधखुळी नाही. जीना हाऊसशी भारतीयांच्या वाईट आठवणी जुळलेल्या आहेत, तशाच आठवणी आग्रा येथील ताजमहल बाबतीतदेखील आहेत. भारतातील एक वर्ग तर असा आहे की त्यांना हा ताजमहलदेखील पाडून टाकावा वाटतो. ताजमहलाच्या निमित्ताने ज्या कथा सांगितल्या जातात त्यामुळे बहुसंख्य हिंदू समाज आजही संतप्त होतो. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरिअलदेखील बहुसंख्य लोकांना पाडून टाकावे वाटते. मग् या ऐतिहासिक वास्तूही पाडून टाकायच्यात का? या वास्तूशी निगडीत आठवणी अजिबात चांगल्या नाहीत, म्हणून या वास्तू पाडून टाकल्या तर कसे होईल? आ. लोढा यांचा जीना हाऊस पाडून टाकण्याबाबतचा तर्क मान्य केला तर या देशातील बहुसंख्य ऐतिहासिक वास्तू या पाडूनच टाकाव्या लागतील. खास करून अनेक राजे-महाराजांचे राजवाडे, कोठ्या यादेखील पाडून टाकाव्या लागतील. कारण, त्या त्या राजे-महाराजांनी इंग्रजांना साथ देताना अनेक षडयंत्रे याच महाल, राजवाडे आणि कोठ्यांत रचले होते. केवळ या वास्तूच पाडून चालणार नाही तर त्या राजे-महाराजांचे अनेक वारसदार आता राजकारणात आणि सत्ताकारणात आहेत, त्यांनादेखील देशातून हाकलून द्यावे लागेल.
जीना हाऊस पाडून कोणतेही प्रश्न सुटणार नाही, आणि त्यातून काहीही साध्य होणार नाही, हे आ. लोढा यांनी लक्षात घ्यायला हवे. निव्वळ वादग्रस्त मागणी करून चमकोगिरी करणे सोपे असते; परंतु त्यातून निर्माण होणार्या वैचारिक द्वंद्वातून आपण समाज आणि राष्ट्राचे नुकसान करत असतो, हे आ. लोढा यांच्यासह ते ज्या संघाचे भक्त आहेत त्या रा. स्व. संघाच्या धुरिणांच्या कधी लक्षात येणार? हे सत्य आहे की, देशाची फाळणी ही प्रत्येकाच्या हृदयाची भळभळती जखम आहे. भारतीय उपमहाद्वीपातील इतिहासाच्या सर्वात वाईट कालखंडाचा तो क्रूर अध्याय आहे. म्हणून, या वाईटात वाईट घटनेच्या मागील-पुढील घटनाक्रमांचा आपल्या सोयीस्कर अर्थ काढून एखादी वास्तूच पाडण्याची मागणी करणे ही चुकीची बाब आहे. तिचे समर्थन करता येणार नाही. फाळणीने अनेकांची घरे, शेतजमिनी, सगेसोयरे हिरावून घेतली. रक्ताचे पाट वाहिले, अनेक निरपराधांचे नृशंस बळी गेले. मायबहिणींच्या अब्रुचे धिंडवडे निघाले. तो काळाकुट्ट इतिहास आता उगळत बसण्यात काहीही हाशील नाही. जीना हाऊस मातीत मिसळवले म्हणजे एक सूडचक्र पूर्ण होईल; असे कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. झालेल्या जखमा अनंत काळ भळभळत्याच राहणार आहेत, जीना हाऊस पाडल्याने त्या भरून येणार नाहीत. आपण इकडे जीना हाऊस पाडू पाकिस्तान तिकडे भारताशी निगडित एखादी वास्तू पाडून टाकेल, विध्वंसतेचा नवा अध्याय पुन्हा सुरू होईल. अयोध्येतील बाबरी पतनानंतर काय घडले? देशात पुन्हा एक पाकिस्तान जोमाने उभा राहिला. वास्तू पाडून काहीही हाशील होणार नाही. त्यापेक्षा जीना हाऊसचे सांस्कृतिक वारशात रुपांतर करावे. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या देशाला अनेक काळ्याकुट्ट घटनांच्या आठवणी आहेत. त्या अनेक वास्तूंच्या रुपाने जीवंत आहेत. जीना हाऊस त्यातीलच एक!
पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे