जीप-टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू

0

इंदापूर : बोलेरो जीपला पाठीमागून भरधाव वेगात येऊन टँकरने धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील राजवडी गावाच्या हद्दीतील सुदर्शन ढाब्या समोर घडला.

सुवर्णराज भोसराज जयमंगला (20 रा. इंदापूर) असे मयत युवकाचे नाव आहे. ज्ञानसुंदरी दावीदराजू घंटसाला व देवकुमार घंटसाला अशी जखमींची नावे आहेत. दावीदराजू नतानिलु घंटसाला यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी सांगितले, की आज दुपारी साडेतीच्या सुमारास दावीदराजू घंटसाला याची पत्नी ज्ञानसुंदरी, मेव्हणा सुवर्णराज जयमंगला, पुतण्या देवकुमार घंटसाला, सासरे बसुराज जयमंगला असे गावी पुलापुरु येथे निघाले होते. राजवडी गावच्या हद्दीत आल्यानंतर ते सर्वजण नंबर नसलेल्या बोलेरो जीपमध्ये बसले होते. जीप रस्त्याच्या कडेला असताना भरधाव वेगात टँकर (एमएच 12 आरऐ 8658) ने धडक दिली. त्यामध्ये ज्ञानसुंदरी, सुवर्णराज जयमंगला, देवकुमार घंटसाला व बसुराज जयमंगला हे जखमी झाले. महामार्गच्या रुग्णवाहिकेमधून त्यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी आणले. डॉक्टरांनी तपासणी करून सुवर्णराज जयमंगला हे मयत झाल्याचे घोषित करण्यात आले. इतर जखमींना इंदापूर येथील मगर हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल केले. टँकरच्या चालकाने हलगर्जीपणा वाहन चालवून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे.