जीबीमध्ये रिंगरोडवर चर्चेची मागणी केल्यास आम्ही तयार

0

पिंपरी-चिंचवड : वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव परिसरातून जाणार्‍या प्रस्तावित रिंगरोडवर महापालिकेच्या शनिवारी होणार्‍या सर्वसाधारण सभेत चर्चा करण्याची तयारी आहे. नगरसेवकांनी चर्चेची मागणी केल्यास चर्चा करण्यात येईल, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच रिंगरोडवर चर्चेची मागणी करणार्‍यांनी पुन्हा एकदाही चर्चा करण्याची मागणी केली नसल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यावर टीका केली.

बेघरांचे सनदशीर आंदोलन
महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार 30 मीटर रुंद एचसीएमटीआरचा 65 टक्के जागेचा ताबा आहे. उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणी पर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. या कारवाईला बाधित नागरिकांनी विरोध केला आहे. रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून आपले हक्काचे घर वाचविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत.

सभेचे केवळ आश्‍वासनच
जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी रिंगरोडवर चर्चा करण्याची मागणी केली होती. महापौर नितीन काळजे यांनी विषयपत्रिकेवरील विषय संपल्यानंतर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दिले. मात्र, सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला. त्यामुळे महापौरांनी सभा गुंडाळली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर काळजे यांनी रिंगरोडवर चर्चा करण्यासाठी पुन्हा विशेष सभा घेण्यात येईल, असे सांगितले होते. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी देखील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रिंगरोडवर चर्चा करण्यासाठी सभा घेण्यात येईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात सभा घेतली नाही.

मुख्यमंत्री रिंगरोडच्या बाजूने
दरम्यान, भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महापालिकेच्या विविध विकास कामांच्या ’ई’ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि.12) आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रिंगरोड बाधित नागरिक दिवसभर ताटकळत बसले होते. कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस रिंगरोड बाधित नागरिक शिष्टमंडळाला न भेटता जावू लागले. त्यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी प्रवेशद्वार अडवले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रिंगरोड बाधितांचे निवेदन स्वीकारले. मात्र, कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बाधित नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार देखील केला होता.

सर्वसाधारण सभेत रिंगरोडवर चर्चा करण्याची तयारी आहे. नगरसेवकांनी चर्चेची मागणी केल्यास चर्चा करण्यात येईल. मात्र, रिंगरोडवर चर्चेची मागणी करुन नगरसेवक भाऊसाहेब भोईर बाहेरगावी गेले होते. त्यानंतर देखील भोईर यांनी रिंगरोडवर चर्चेची मागणी केली नाही.
-एकनाथ पवार