जीर्ण इमारतींच्या सर्वेक्षणाकडे कानाडोळा

0

भुसावळ शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे काम संथ

भुसावळ:- मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी पालिकेने केवळ गटारींच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील ब्रिटीशकालीन जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण आणि जीर्ण इमारतीच्या मालकांना नोटीस देण्याचीही प्रक्रिया अद्याप पालिकेने सुरू केलेली नाही. यामुळे पावसाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणावर अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे.

या भागात जीर्ण इमारती अधिक
शहरातील मध्यवर्ती व हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल मंदिर वॉर्ड, बालाजी गल्ली, सराफ बाजार, मॉडर्न रोड, जाम मोहल्ला आदी भागात किमान 80 पेक्षा अधिक जीर्ण इमारती आहेत. यासह गरुड प्लॉट, म्युनिसीपल पार्क, न्यू एरिया वॉर्ड आदी भागांमध्येही या जीर्ण इमारतींचे प्रमाण अधिक आहे. यामुळे या इमारतींच्या मुळ मालक तसेच भाडेकरूंना मान्सूनपूर्वी नोटीस बजावणे या इमारतींच्या परीसरात सदरील इमारत जीर्ण असल्याबाबतचा फलक लावणे आदी उपायोजना करणे अपेक्षीत आहे मात्र पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. बहुतांश जीर्ण इमारतींच्या संदर्भात जागा मालक आणि भाडेकरु तसेच भाऊ हिश्यांचे वाद असल्याने त्यावर निर्णय होत नाही. शहरातील काही इमारतींबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. यामुळे या इमारती नष्ट करता येत नाही मात्र किमान मान्सूनपूर्वी संभाव्य बचावात्मक उपाययोजना करणे अपेक्षीत आहे.