जीर्ण कौलांचे गौडबंगाल ; पोलिसांनी मागवली माहिती

0

विरोधी नगरसेवक गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम

भुसावळ- पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयातून काढण्यात आलेल्या जीर्ण कौलांची चोरीछुपे वाहतूक होत असल्याचा आरोप जनाधारच्या विरोधी नगरसेवकांनी करीत वाहतूक रोखून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी बुधवारी शहर पोलिसांनी पालिकेकडून लेखी अहवाल मागविला आहे. दरम्यान, या प्रकरणी माजी आमदार संतोष चौधरींसह सचिन चौधरी व विरोधी गटाच्या नगरसेवकांनी या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी बुधवारी सायंकाळी केली.

वाहन जप्त, पोलिसांनी केला पंचनामा
पालिकेच्या दवाखान्यातून जीर्ण कौलांची वाहतूक बेकायदा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विरोधकांनी हा प्रकार हाणून पाडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसांना गटनेते उल्हास पगारे यांनी तक्रार केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांना लेखी पत्र दिले. कौलांची विक्री करण्याचा काही ठराव आहे का? कौले विक्री करण्यासाठी निविदा काढली होती का? पालिकेने कौले कोणाला विक्री केली असल्यास त्याचे लेखी आदेश दिले आहे का? याची सविस्तर माहिती पोलिसांनी मागविली आहे. विरोधकांनी पालिकेतील कौलांची चोरी करून परस्पर विक्री केली जात असल्याचा आरोप केला असून पालिका प्रशासनाने मात्र ही कौले मोफत दिल्याचा दावा केला आहे. पालिकेकडून लेखी माहिती आल्यावर गुन्हा दाखल करायचा अथवा नाही यावर निर्णय होणार असलातरी त्यासाठीदेखील सरकारी फिर्यादी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.