जीर्ण तलाठी कार्यालयाच्या नूतनीकरणाला मुहूर्त कधी मिळणार

0

कर्जत । सडलेले दरवाजे, तुटलेली तावदाने, फुटलेले पत्र्याचे छत, भिंतीना गेलेले तडे, जागोजागी निखळलेले प्लास्टर, कार्यालयाच्या अवतीभवती पावसाचे पाणी साचल्याने निर्माण झालेली दलदल, सभोवताली जंगली झाडाझुडपांचा विळखा, अशी विदारक स्थिती कर्जत शहरातील मुख्य तलाठी कार्यालयाची झाली आहे तसेच कार्यालयातील दस्तऐवजांना मोठ्या प्रमाणात वाळवी लागल्याने महसुली दस्तऐवजच नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. साहजिकच यामुळे अशा परिस्थितीत कार्यालयात उपस्थित राहून काम करणे, कर्मचार्‍यांसाठी त्रासदायक ठरत आहे तसेच मुख्य महत्त्वाचे दस्तऐवजही अशा या इमारतीत सुरक्षित नसल्याचेही बोलले जात आहे.

कार्यालयात कोंदट वातावरणात कर्मचार्‍यांना करावे लागतेय काम
कर्जत मुख्य तलाठी कार्यालयाला स्वतःची इमारत नसल्याने भूमिअभिलेख कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या एका चाळ सदृश्य छोट्याशा वास्तूत तलाठी कार्यालय स्थलांतर करण्यात आलेले आहे. ही वास्तू लहान असून त्यावर सिमेंटच्या पत्राचे छत आहेत. वास्तू उभारताना भक्कम पाया उभारला नसल्याने संपूर्ण कार्यालया भोवती पाणी साचून भिंतीना ओल येत आहे.

कार्यालयात कोंदट तसेच दमट वातावरणात कर्मचार्‍यांना काम करावे लागत आहे. वारंवार भिंती ओलसर झाल्याने भिंतीचे प्लास्टर जागोजागी निखळले असून या वास्तूला वाळवीचीही बाधा झाल्याने या कार्यालयातील लाकडी स्टॅण्ड वर ठैवलेल्या महत्वाच महसूली दस्तऐवजांनाही वाळवी लागली आहे. लाकडी कपाटांचीसुध्दा तोडमोड झाली असून कर्मचार्‍यांना तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना बसण्यासही योग्य अशी आसन व्यवस्था नसल्याने सर्वांचीच गैरसोय होत आहे.

रोगराईला निमंत्रण
पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह या मूलभूत बाबाींची कमतरता असल्याने या समस्येत अधिकच भर पडत आहे. कार्यालयाभोवती पावसाचे साचलेले पाण्याचा निचरा होत नसल्याने कार्यालयाकडे येणार्‍या मार्गावरच दलदल सदृश परिस्थिती तयार झाली असूून त्यावर जंगली झाडाझुडपाचें साम्राज्य पसरले आहे. विषारी प्राण्यांचा मुक्त संचारही सुरू आहे. परिणामी, डासांची उत्पत्ती वाढून रोगराईला आयेतेच निमंत्रण मिळत आहे. तरी संबंधित प्रशासकीय विभागाने या कार्यालयाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी होत आहे.