जीर्ण विद्युत खांबांची लटकती तलवार

0

मुरुड : मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील मोरापाडा भागात गेल्या अनेक वर्षांपासून तळाला जीर्ण झालेल्या विद्युत खांबामुळे त्या परिसरातील नागरिकांवर अपघाताची टांगती तलवार लटकत आहे. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाशी वर्गाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तरी विजमंडल अधिकारी कर्मचारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त आहेत. जीर्ण झालेला विद्युत खांब हा रहदारीच्या रस्त्यावर आहे तसेच त्याच्या बाजूला घरं व खांबाच्या समोर मंदिरसुद्धा आहे. येथून वावरताना किंवा रात्री अपरात्री खांब पडला तर अपघाताचा प्रसंग घडू शकतो. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वायरमनसारखी सेवा कंत्राटी पद्धतीने देण्यात येत आहे. वीज मंडळाच्या पायाभूत सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देखील कंत्राटी कामगार नेमले आहेत. त्यामुळे ग्रामीण, शहरी भागात विजेचा खेळखंडोबा उडत आहे. त्याचा फटका ग्रामीण भागात मोठया प्रमाणात ग्राहक सहन करीत आहेत. तालुक्यात सध्या वीज वितरण कंपनीविरोधात असंतोष निर्माण झाला असून ग्रामीण भागात सतत वीज खंडित होत असल्याने जनतेत प्रचंड नाराजी आहे.

वीज मंडळाच्या कार्यालयात जबाबदार अधिकारी नाही
विद्युत मंडळाचे कर्मचारी यांच्या बदल्या झाल्या परंतु त्यांच्या बदली दुसरा कर्मचारी आला नसताना सुध्दा त्यांना येथून कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते कंत्राटी स्वरूपाचे. जबाबदार असा अधिकारी कोणीही नाही. विद्युत मंडळाच्या बोर्ली किंवा मुरुड कार्यालयात दूरध्वनीवरून वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनीची रिंग वाजून पूर्ण झाली तरी कार्यालयात कर्मचारी असून सुद्धा फोन उचलण्याची तसदी कोणीही घेत नाही. बोर्ली येथील मंदिरात वीज तीन दिवसांपासून खंडित आहे त्याबाबत तक्रार करूनसुद्धा कोणीही लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडण्याची शक्यता
मुरुड तहसीलदार उमेश पाटील हे बोर्ली येथे आले असता ग्रामस्थांनी त्यांच्याकडे विजेच्या समस्यांबाबत गार्हाशणे मांडले. यावेळी नागरिकांनी विद्युत मंडळाच्या ह्या हलगर्जीपणामुळे कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडण्याची शक्यता तहसीलदारांना बोलून दाखवली व आपण यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती केली. बोर्ली येथे कार्यरत असणार्याआ कंत्राटी कर्मचारी यांच्यापैकी प्रत्येकाकडे जवळपास पंधरा ते वीस ट्रान्स्फमर आहेत. आम्हीही माणसं आहोत. आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवणार. असा सवाल विद्युत मंडळातील एका कर्मचारी याने केला आहे.

मुरुड तालुक्यात विद्युत मंडळाची समस्या ही बिकट आहे. मी मुरुड तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लक्षात आले की दिवसात फक्त दहातास विद्युत पुरवठा होत आहे. विद्युत मंडळाचे मुरुड उपअभियंता येरेकर यांना तात्काळ बोर्ली येथे कर्मचारी देऊन विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठीचे आदेश वजा सूचना केल्या आहेत.
– उमेश पाटील,तहसीलदार मुरुड-रायगड