मुंबई : पुत्रप्रेमात आंधळा होऊन मी बेघर झालो. त्यामुळे जिवंत असेपर्यंत संपत्ती मुलांच्या नावे करू नका, असे भावनिक आवाहन प्रख्यात रेमंडस् समुहाचे माजी सर्वेसर्वा विजयपत सिंघानिया यांनी पालकांना केले. पुत्रप्रेमात मी आंधळा झालो होतो. याच आंधळेपणातून एका बेसावधक्षणी माझ्या नावावरचे सगळे शेअर मी त्याच्या नावावर करून बसलो आणि माझ्यावर बेघर होण्याची वेळ आली, अशी खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना वडिलांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कुणीतरी स्वत:च्या स्वार्थासाठी माझ्या वडिलांची दिशाभूल करत आहे, असेही ते म्हणाले.
भविष्याचे काही सांगता येत नाही!
रेमंडस् समुहाचे माजी अध्यक्ष व उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचा सध्या त्यांच्या मुलाशी म्हणजेच गौतम सिंघानिया यांच्याशी संपत्तीवरून वाद सुरू आहे. हा वाद सामोपचाराने मिटावा, असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र, मुलाबद्दलच्या मतांवर ते आजही ठाम आहेत. मी खोटा असेन तर गौतमने तिरुपती बालाजीची शपथ घेऊन तसे सांगावे. तसे झाले तर, मी त्याच्याविरुद्धचा खटला मागे घ्यायला तयार आहे. पण गौतम असे करणार नाही, असे त्यांनी हतबल होत सांगितले. माझ्याकडील सगळे काही मुलाच्या नावावर करून मी घोडचूक केली. माझ्या या चुकीमुळे त्याचे खरे रूप समोर आले. अनेकदा लोक स्वत:चा खरा चेहरा लपवत असतात. पण त्यांच्याकडे ताकद आली की ते बिघडतात. मी काहीही खरेदी करू शकतो हा अभिमान त्यांच्यात येतो. जिवंत असेपर्यंत आपली सर्व संपत्ती कधीही मुलांच्या नावावर करू नका. भविष्याचे काही सांगता येत नाही. कदाचित तुमचा मुलगा घराण्याच्या नावाला बट्टाही लावू शकतो. वडिलांनी आपल्यासाठी काय केले आहे, हे विसरून तो आपले खरे रंग दाखवू शकतो, अशा शब्दात विजयपत सिंघानियांनी आपबिती व्यक्त केली.
गौतम म्हणतात, वडिलांना कुणी तरी भडकाविले!
या प्रकरणात खलनायक ठरलेले उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना वडिलांचे आरोप फेटाळले आहेत. कुणीतरी स्वत:च्या स्वार्थासाठी माझ्या वडिलांची दिशाभूल करत आहे. त्यांच्या या अवस्थेबद्दल मला वाईट वाटते. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र ते भेटायला आले नाहीत. घरातील भांडण त्यांनी असे चव्हाट्यावर आणायला नको होते, असेही गौतम म्हणाले. वडिलांबद्दल माझ्या मनात कसलाही आकस नाही. कंपनीच्या समभागधारकांनी संमती न दिल्यामुळेच मी त्यांना ‘जेके’ हाऊसचा ताबा देऊ शकलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, हे प्रकरण सद्या न्यायप्रविष्ठ असून, न्यायालयाने बाप-लेकांना आपसी समजुतीने प्रकरण मिटविण्याचा सल्ला दिलेला आहे.