जीवघेणं पर्यटन

0

पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची मजा काही औरच असते. परंतु, यावेळी काही काळजी घ्याव्या लागतात. सध्याची तरुणाई त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि मृत्यूच्या जवळ जाण्याचा स्टंट करून त्याचा थरार अनुभवण्याचा प्रयत्न करते. निसर्गाच्या सान्निध्यात असताना त्याचे सौंदर्य डोळ्यांत साठवा, त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या… असं जर केलं तर आपल्याला या निसर्गाचा खराखुरा अनुभव घेता येतो. त्याचा आनंद लुटता येतो. मात्र, आजची तरूणाई ही खत्रों के खिलाडी है… यामुळे त्यांना निसर्गामध्ये रमतानाही सोशल मीडियावर त्याची अपडेट देणे जास्त महत्त्वाचं वाटते. कधी-कधी धोकादायक ठिकाणी जाण्यास बंदी असली तरी तेथे जाणे ते पसंत करतात. काही ठिकाणी स्थानिकांनी जाण्यास मज्जाव केला तरीही ते स्थानिकांना न जुमानता त्या धोकादायक ठिकाणी जातातच… नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असल्यास तिथे जाण्याचे टाळले पाहिजे. परंतु, ती नदी पार करण्यात शूरता मानणारे पर्यटकही अनेक आहेत.

पाण्याचा अंदाज नसणार्‍या नदीत-समुद्रात उतरून स्वत:चा जीव धोक्यात घालणे, याकडे त्यांचा जास्त कल असतो. गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या अपघातांमधून हेच दिसून येते. सहलीला जाण्याची आणि सहलीच्या नावाखाली स्टंटबाजी करण्याची सध्याची स्टाईल झाली आहे. सहलीला जाताना योग्य नियोजन, सहलीच्या ठिकाणाची आवश्यक माहिती, तेथील पूर्ण माहित असलेली एखादी व्यक्ती सोबत असणे गरजेचे असते. एखादा अपघात झाला की, काय करावे, कोणाशी संपर्क साधावा, अपघातग्रस्त व्यक्तिवर कसा प्रथमोपचार करावा इत्यादी बाबींची सविस्तर माहिती असल्यावर सहलीला निघालो की ती सहल यशस्वी ठरते आणि त्याची पूर्ण मजाही लुटता येते. परंतु, आता व्यस्त असणारे मंडळी सुट्टी आहे, विकेण्ड आहे, म्हणून ग्रुपमध्ये सहलीची तारीख ठरवतात आणि मग कोणतीही माहिती न घेता सहलीचा आनंद लुटण्यासाठी निघतात. यावेळी अतिउत्साहात स्टंट करणार्‍या तरूणांना आपले प्राण गमवावे लागतात.

अमित राणे- 8087173768