देहूरोड : मामुर्डी येथील सिध्दार्थनगरात एकावर प्राणघातक हल्लाप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमी तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. राजू हिंगे, कुणाल शिंदे आणि अर्जुन विधाते (सर्व रा. सिध्दार्थनगर, मामुर्डी) या तिघांना अटक केली आहे. पोलिस सूत्रांनुसार गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मामुर्डीतील अनिल राऊत हा सिध्दार्थनगर येथे आला होता. यावेळी संशयितांशी त्याचे भांडण झाले. या भांडणात वरील तिघे व त्यांच्या साथीदारांनी अनिलवर प्राणघातक हल्ला चढवला. यात लोखंडी रॉडचाही वापर करण्यात आला. जखमीवर प्रथम देहूरोड येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. त्यानंतर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. निवडणूकीतील कारणावरुन हा प्रकार झाल्याचे फिर्यादी अनिल कचरू राऊत याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक आदीनाथ महानवर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.