मुंबई | अवयवदान हे श्रेष्ठदान आहे, अवयव दान केल्याने गरजू रुग्णाला जीवनदान मिळते शिवाय अवयवदात्याला व त्या दात्याच्या नातेवाईकांना एखाद्याला जीवनदान दिल्याचे पुण्य प्राप्त होते, मुंबईमधे सध्या अनेक गरजू रुग्णांना अवयव दानाची गरज आहे. मात्र याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने अवयवदान केले जात नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून अवयवदाना बाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था देखील अवयव दान अभियान मोठ्या प्रमाणावर राबवित आहेत.
सदगुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन याशैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी संस्थेव्दारे व महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत राबविण्यात येत असलेल्या अवयवदान अभियानाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
जीवनविद्या मिशन संस्थेमार्फत अवयव दानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये यासाठी लोकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे. तसेच संस्थेमध्ये कार्यरत स्वसंसेवक लोकांना अवयवदान व देहदानाचे महत्व पटवून देत आहेत. त्यामुळेच या संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीन ते चार महिन्यात जवळजवळ ३२००हून अधिक लोकांनी या अवयवदान अभियानाला सक्रिय प्रतिसाद देत मरणोत्तर अवयवदानासाठी नोंदणी केली.
या संदर्भात जीवनविद्या मिशन तर्फे दादारामधील नायर सभागृह येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या अवयवदानाची प्रतिज्ञापत्रे झेडटीसीसीकडे सुपुर्द केली. या प्रंसगी जीवनविद्या मिशनचे विश्वस्त व सचिव विवेक बावकर, विश्वस्त अजित पटाडे, श्रीपांगम, श्री रासम व झेडटीसीसीचे उपाध्यक्ष, महासचिव, डॉक्टर माथूर, सुजाता अष्टेकर, उर्मिला महाजन व सदस्य उपस्थित होते.
जीवन विद्या मिशन तर्फे यापुढेही हे अवयव दान अभियानांतर्गत जनजागृतीचे समाजकार्य चालूच राहणार आहे. जीवन विद्या मिशन तर्फे सर्व जनतेला अवयवदान अभियानात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी jeevanvidya.org या संकेत स्थळावर संपर्क करण्याचे आवाहन जीवन विद्या मिशनतर्फे करण्यात आले आहे. संपर्कासाठी ई-मेल : donateorgan@jeevanvidya.org