जळगाव । जग प्रचंड मोठे आहे. त्या मानाने माणसाचे आयुष्य खूप छोटे आहे. या छोट्याश्या आयुष्यात काही मोठ्ठ करून दाखवायच असले तर वेळेचे नियोजन करायला शिका, आपल्यातले गुण ओळखले पाहिजे, ध्येय ठरविले पाहिजे, ध्येय प्राप्तीच्या प्रवासात अडथळे खूप येतील. मात्र जिद्द, चिकाटीने सतत प्रयत्न करा, यश हमखास मिळेल, असा सल्ला आयआयटी सुवर्णपदक विजेती सुकन्या पाटील हिने विद्यार्थ्यांना दिला. नोबेल फाउंडेशनतर्फे सुकन्याच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ती बोलत होती.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राध्यापक होमसिंग पाटील, लेखक डॉ़ किरण देसले, सुकन्याचे वडील विजयसिंग पाटील, आई डॉ़ संगीता पाटील यांची उपस्थिती होती. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. सुकन्या हिचा आई-वडीलांसमवेत स्मृतीचिन्ह देवून तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुकन्या हिचा भाऊ अंकित हाही आयआयटीला शिकत असून त्याचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थीनी अवंतिका महाजन हिने सुकन्याचा परिचय करून दिला. आयआयटीसाठी निवड झालेल्या प्रथमेश बोरसे यासह दहावी परिक्षेतील गुणवंत रोशन रायसिंग, अवंतिका महाजन, पंकज राठोड, हर्षल पाटील, महेश मनोरे यांचाही पुस्तके देवून सत्कार करण्यात आला. सुकन्या हिचे आई व वडील यांची प्रा.रामचंद्र पाटील व वक्ते मनोज गोविंदवार यांनी मुलाखत घेतली.
जीवन प्रवास उलगडला
सुकन्याने यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सूत्रसंचालन नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील तर आभार संचालक विशाल पाटील यांनी मानले. यशस्वितेसाठी फाउंडेशनच्या सदस्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सुकन्या हिने 11 वी ते सुवर्ण पदक असा शिक्षणाचा प्रवास उलगडला. ती म्हणाली, कन्याशाळेत शिक्षण घेतले. आईमुळे वाचनाची सवय जडली. ही मला माझ्या आत्ताच्या पुढील आयुष्यात कामात येणार आहे. आयआयटीत शिकत असताना बारा-बारा तास अभ्यास केला. पुस्तकाचा फडशा पाडल्याशिवाय मनाला शांती होत नव्हती. वेगवेगळ्या दृष्टीने ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. केवळ अभ्यासच नाही, नाहीतर वेगवेगळे कला-कौशल्य आत्मसात केली. व प्रवासातील अडथळ्यांवर मात केली असेही सुकन्या म्हणाली.