जीवनात विपरीत परिस्थितीला न घाबरता सामोरे जा

0

भुसावळ। प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे घटना घडत नाही याचा परिणाम ताण वाढतो व त्यातूनच नैराश्य येऊन आपण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो मात्र आत्महत्या हा पर्याय नाही, असे मत जळगावचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.विजय श्रीमुठे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील आयएमए सभागृहात शुक्रवार 4 रोजी सकाळी भुसावळ विभागातील कर्मचार्‍यांसाठी ताण-तणाव मुक्तीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरिकांचे समाधान करा
सहा.अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, पोलीस ठाण्यातील ताण तेथेच सोडून द्या. पोलीस ठाणे व हॉस्पीटल अशी जागा आहे जेथे नागरिक त्रासाशिवाय जात नाही त्यामुळे प्रत्येकाचे समाधान करा, स्मितहास्य द्या, असेही ते म्हणाले.

योगसाधनेला प्राधान्य देण्याची आवश्यकता
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी आभार मानले. डॉ.श्रीमुठे मार्गदर्शनात म्हणाले की, पोलीस म्हटला म्हणजे सर्वसामान्यांला ताण येतो मात्र तोही शेवटी माणसुच आहे मात्र तो ताण दाखवू शकत नाही कारण त्यांच्या अंगावर वर्दी आहे. हल्ली पाच ते 80 वर्षापर्यंतच्या वयोवृद्धातून मला ताण आल्याचे बोलले जाते अर्थात हे बोलण्यामागे मनासारखी गोष्ट घडत नाही हे प्रमुख कारण आहे. नकारात्मक विचारशक्ती सुरू होते व आपण विचारांच्या चक्रव्युहात अडकतो. ताण कमी करण्यासाठी दारू व मादक द्रव्याचे सेवन चुकीचेच आहे. तणाव मुक्तीसाठी पोलिसांनी योगा व व्यायाम करणे गरजेचे आहे. कुटुंबाला वेळ द्या, सकारात्मक विचाराकडे वळा त्यामुळे तणाव कमी होईल.