मुंबई । ‘जीवनाधार फाऊंडेशन’ ही सेवाभावी संस्था रुग्णवाहिका सेवा, गरजूंना आर्थिक मदत, रक्तदान, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून परंपरेचे दर्शन या कार्याला महत्त्व देत असतांना यंदा मुंबईला घडवणार्या मुंबईकरांना पुरस्कार देऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या हेतून यंदा अशा कर्तृत्त्ववान दिग्गजांचा सन्मान करणार आहे. यासाठी मुंबईत 18, 19, 20 सप्टेंबर 2017 या दिवशी ‘मुंबै महोत्सवा’चे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेश खाडे यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे.
सर्व क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती
पहिल्यावहिल्या या पुरस्कार सोहळ्यात धार्मिक क्षेत्रात अनमोल कार्य करणार्या जयराज साळगावकर, वाद्यवृंदाला आयाम देणारे अशोक हांडे, जाहिरातीच्या क्षेत्रात आपली कल्पकता दाखविणारे दिग्दर्शक भरत दाभोळकर, महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून प्रेक्षकांत मानाचे स्थान मिळविणार्या भरत जाधव यांना हा पुरस्कार त्यांच्या विशेष कार्यासाठी जाहिर झालेला आहे. या कार्यक्रमाला साहित्य, कला, विज्ञान, अभिनय, राजकीय, प्रशासकीय इत्यादी सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
मुंबईबद्दल आपुलकी निर्माण होण्यामागील दामोदर नाट्यगृह, रविंद्र नाट्यमंदिर इथे सायंकाळी 7 वाजता या ‘मुंबै महोत्सवा’चे आयोजन करण्यात आलेले आहे. तिथे अवधूत गुप्ते, वैजयंती कुलकर्णी- आपटे, पुरुषोत्तम बेर्डे, किरण शांताराम यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार दिले जाणार आहेत. याशिवाय विविध क्षेत्रात अनमोल कार्य करणार्या अरविंद सावंत, विनोद तावडे, सुभाष दळवी, शामसुंदर सोन्नर, गणेश शिंदे, कॅप्टन शाहू डांगे, रमेश कदम, प्रवीण आंब्रे, श्रवण राठोड, अशोक खाडे, अच्युत पालव, रजनीश राणे, सुधीर- नंदिनी थत्ते, रमेश उदारे, मिलिंद म्हैसकर यांनासुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. यातून व्यक्तिंबद्दल तसेच त्यांच्या योगदानाबद्दल आदर निर्माण व्हावा हा मुख्य हेतू असला तरी सर्व धर्मातील लोकांना सामावून घेणाऱ्या या मुंबईबद्दल आपुलकी निर्माण व्हावी हाही त्यापाठीमागचा मुख्य उद्देश आहे.