जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

0

शहादा। देशात कोरोना या जीवघेण्या संसर्ग साथीच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे . कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र शासनाने संपुर्ण देश १४ एप्रिल पर्यत लॉकडाऊन केला आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. गरजू व रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आता दोन वेळच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतांना शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून अशा लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अविरत सुरु केला आहे . यात गायत्री केटर्स व शेवता भोजनालय यांनी संयुक्त विद्यमाने उपाशी असणाऱ्यांसाठी दररोज सुमारे २५० ते ३०० लोकांचे जेवण तयार करुन त्यांना जागेवर वाटप केले जात आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २४ मार्चपासून २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. अचानक संपुर्ण देशात संचारबंदी जाहीर झाल्याने विस्तापितांसाठी मायदेशी परत येणे मोठे जिकरीचे झाले. तसेच दररोज रोजंदारीने काम करणाऱ्यांच्या पोटावर मोठी कुऱ्हाडच पडली . शहादा शहरात मोठ्या प्रमाणावर हातावर पोट भरणाऱ्याची संख्या आहे . शहरातील अनेक भाग अशा गरज लोकांनी व्यापला आहे . आज कामावर गेले तरच चुल पेटते अशी परिस्थिती असंख्य कुटूंबांची आहे. त्यातच अचानक व जास्त दिवसांची संचारबंदी अशा लोकांसाठी विचारात टाकणारी आहे. परंतू शहादा शहर हे दातृत्वाचे स्थान मानले जाते हे अनेक उपक्रमातून सिध्द झाले आहे. लॉकडाऊननंतर अशा गरज कटंबांचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना शहरातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, व्यक्तीगत, धार्मिक, प्रशासन पुढे येत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरु केले आहे . ही मदत गरजूंच्या घरापर्यंत पोहचत असल्याने त्यांची चुल पेटलेली आहे. परंतू जे उघड्यावर असतात अशा जनतेचे काय ? असा प्रश्न काही सामाजिक संस्थांना पडला असतांना त्यांनी अशा लोकांसाठी दोन वेळेचे जेवण त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे धाडस केले आहे . गेल्या ११ दिवसांपासून अविरत जेवण पोहचविण्याचे काम केले जात आहे . भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष जितेंद्र जमदाडे व भाजपाचे कार्यकर्ते तसेच गायत्री केटर्स तसेच शेवता भोजनालय यांनी दोन वेळेचे जेवण तयार करुन उपाशी असणाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरु केले आहे. गायत्री केटर्सचे संचालक विजय गिरासे , शेवता केटर्सचे संचालक योगेश पाटील हे व त्यांची टीम दररोज २५० ते ३०० जेवण तयार करुन त्यांच्यापर्यंत पोहविण्यात येते. शहादा परिसरातून असंख्य मजूर कामानिमित्त मोठ्या शहरांमध्ये गेले होते. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद झाल्याने त्यांना मायदेशी परत येतांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे . शेकडो किलोमीटरची पायपीट करीत ते शहर , आपले गांव साधत आहेत . अशा असंख्य स्थलांतरीत मजूरांना ही जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. जिथे उपाशी गरजू दिसला त्वरित वरिल संस्थेशी किंवा इसमांशी संपर्क साधित जेवणाची सोय उपलब्ध करण्यात येत आहे . संचारबंदीत गरजू व उपाशी असणाऱ्या जनतेचे पोट भरण्याचे काम शहरातील अशा दातृत्व निभावणाऱ्या लोकांकडून केले जात असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे .