पुणे । एक रकमी गुंतवणूक केल्यानंतर आयुष्यभर पेन्शन देणारी जीवन अक्षय योजना (प्लॅन) भारतीय आयुर्विमा मंडळाने (एलआयसी) 30 नोव्हेंबरपासून बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जागतिक पातळीवर व्याजदरात मोठी घट होत असल्याने ग्राहकांच्या हिताची आणि लोकप्रिय अशी ही योजना बंद होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
30 ते 85 वर्षे वयोगटातील व्यक्तींना एलआयसीच्या या जीवन अक्षय प्लॅनमध्ये एकदा पैसे गुंतवले की, पुढच्या महिन्यापासून लगेच पेन्शन चालू होते. मासिक, तिमाही, सहामाही अथवा वार्षिकपद्धतीने ही पेन्शन आयुष्यभर मिळत राहते. तसेच मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीच्या वारसाला त्याचा लाभ मिळत होता. बाजारातील इतर कंपन्या व बँका यापेक्षा अधिक व्याज जीवन अक्षयवर मिळत होते. शिवाय, आयुष्यभर त्याचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. या प्लॅनप्रमाणे गुंतवणूकदारांना 7 टक्के व्याज मिळत राहणार आहे.
गेल्या काही वर्षात व्याजदरात वारंवार घट होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन एलआयसीने जीवन अक्षय बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 1995मध्ये जीवन अक्षय सुरू झाली, त्यावेळी 12.30 टक्के इतका व्याजदर होता. मात्र, त्यामध्ये घट होत आज हा दर 7 टक्क्यांवर आला आहे. व्याजदरात वारंवार घट होत असल्यामुळेच हा प्लॅन बंद होण्याची शक्यता आहे. आज देशात कोट्यवधी लोक या प्लॅनचा लाभ घेत आहेत. मात्र, यापुढे या प्लॅनचा लाभ नव्या ग्राहकांना घेता येणार नाही.
400 कोटींची उलाढाल
जीवन अक्षय ही एक पेन्शन योजना आहे. ज्यामध्ये आजीवन पेन्शन मिळत राहते. त्यामुळे एलआयसीची ही लोकप्रिय योजना आहे. गेल्या वर्षात पुण्यातील एलआयसी विभागाने साडेचार हजारांच्यावर ग्राहकांनी जीवन अक्षय प्लॅन घेतला असून, जवळपास 400 कोटींची उलाढाल झाली आहे. परंतु, आता जीवन अक्षय बंद होणार असल्याने नव्या ग्राहकांना या पेन्शन प्लॅनचा लाभ मिळणार नसल्याचे एलआयसी पुणे विभाग-1 वरिष्ठ मंडळ प्रबंधक प्रसांत नायक यांनी सांगितले.