जळगाव : अखिल खानदेश युवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पिलखेडा गावातील तरुण उद्योजक जीवन चौधरी यांना ‘उद्योग भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते जीवन चौधरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला जळगावचे खा. ए.टी. पाटील, खा. अमर साबळे, जनशक्तिचे संपादक कुंदन ढाके, लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, सचिन पटवर्धन, आ.बाळासाहेब भेगडे उपस्थित होते. शून्यातून सुरु केलेला व्यवसाय शिखरावर नेणाऱ्या युवा उद्योजकाला हा पुरस्कार दिला जातो.
शून्यातून केली व्यवसाय निर्मिती
जीवन चौधरी यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याची म्हण सार्थक ठरविली आहे. जळगाव तालुक्यातील पिलखेडा गावात देखील भक्तीच्या मार्गाने संतुलित सामाजिक विकास कसा करावा याचे मूर्तिमंत उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. गावात दारूबंदी, विविध सामाजिक कामे त्यांनी युवकांच्या मदतीने प्रत्यक्षात उतरवली आहेत. गावातील लोकांच्या मदतीने मंदिर उभारल्यापासून व्यसनाधीनतेचे प्रमाण शून्यावर आणण्याचे काम त्यांनी करून दाखवले आहे. उद्योगाच्या क्षेत्रात नव-नवी शिखरे पादाक्रांत करत जीवन चौधरी यांनी देशाबाहेर देखील आपला व्यवसाय फोफवायला सुरुवात केली आहे. याच कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला.
गावाप्रती ओढ कायम
पुण्यात राहून आपल्या व्यवसायाला शिखरावर नेणाऱ्या जीवन चौधरी यांचे आपल्या गावाप्रतीचे प्रेम अद्यापही कायम आहे. गावचे सरपंच असताना जीवन चौधरी यांनी गावात रस्ते, वृक्षारोपण, मुलांना वह्या पुस्तके, कपडे वाटप यांसारखे उपक्रम अगदी चोखपणे राबवले. पुण्यात जाऊन सुरुवातीला दुसऱ्याच्या कंपनीत नोकरी करून आता स्वताची कंपनी स्थापन करून अनेकांना जीवन चौधरी यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जीवनात अनेक संघर्षाच्या पायऱ्या चढून लौकिक मिळविणारे जीवन चौधरी आज युवकांसमोर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून उभे राहिले आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.