जीवन नगरातील बंद घर चोरट्यांनी फोडले !

0

जळगाव। शहरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा घरफोड्यांचे सत्र सुरु झाले आहे. आज सोमवारी जीवनगनरात राहणार्‍या गुरव कुटूंबियांच्या बंद घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा ताडून चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीमुळे जीवन नगरात परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता पुन्हा चोरट्यांनी डोकेवर काढले असून काही दिवसांच्या विश्रांतीनंतर घरफोड्या होत असल्याच्या घटना घडत आहेत. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामान अस्ताव्यस्त फेकलेले
जीवन नगरातील प्लॉट नं. 22 मध्ये भुषण शांताराम गुरव (वय-33) हे कुटूंबियांसोबत राहतात तर ते खाजगी नौकरी करतात. 1 मार्च रोजी भुषण गुरव हे घराला कुलूप लावून काही कामानिमित्त कुटूंबियांसोबत बाहेर गावी गेले होते. त्यामुळे घरी कुणीच नव्हते. या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याचा फायदा घेत दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटातील सोने-चांदीचे दागिने तसेच 10 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. यानंतर आज सोमवारी 3 मार्च रोजी सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास भुषण गुरव हे कुटूंबियांसोबत घरी परतले. यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा तर दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. घरात प्रवेश करताच त्यांना सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले.

कपाट फोडून दागिने लांबविले
आतल्या खोलीतील प्रवेश केल्यानंतर त्यांना कपाट फोडलेले दिसले. त्यातील सामानही फेकलेला दिसला. कपाटाची पाहणी केल्यानंतर त्यांना सोने-चांदीचे दागिने व 10 हजार रुपयांची रोकड असा एकूण 39 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले. गुरव यांनी लागलीच सकाळी रामानंदनगर पोलिसांची संपर्क साधून त्यांना घरफोडी झाल्याची माहिती दिली. रामानंद पोलिसांनी लागलीच घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक प्रविण वाडीले व डिबी कर्मचारी उपस्थित होते. यानंतर उपविभागीय पोलिस अधीकारी सचिन सांगळे यांनी देखील घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच याप्रकरणी भुषण गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.