भुसावळ- उसनवार घेतलेले 600 रुपये मागण्याचा राग आल्याने तक्रारदार सुबेदार नसीर तडवी याच्यावर संशयीत आरोपी अशरफ रशीद तडवी (बोरखेडा बु.॥ ता.यावल) याने चाकू हल्ला चढवला होता. ही घटना 21 फेब्रुवारी 2015 रोजी घडली होती. या घटनेत तक्रारदाराचा मित्र रहेमान तडवी हा भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला चढवण्यात आला होता. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आल्यानंतर उपनिरीक्षक एम.जे.मोरे यांच्यासह 10 साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा घडल्यापासून आरोपी हा कारागृहातच होता. न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले. भादंवि 307 साठी तीन वर्ष सक्तमजुरी तसेच दोन हजार रुपये दंड तसेच कलम 506 साठी एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारतर्फे अॅड.विजय डी.खडसे यांनी काम पाहिले तसेच फिर्यादीतर्फे खाजगी वकील म्हणून अॅड.मनिषकुमार वर्मा यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.विजयालक्ष्मी मुत्याल व अॅड.सचिन कोष्टी यांनी सहकार्य केले.