जीसॅट-6 एचे यशस्वी प्रक्षेपण, लष्कराची ताकद वाढली!

0

दुर्गम भागातील मोबाईल नेटवर्कही सुधारणार

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधऩ संस्था इस्रोने गुरुवारी सायंकाळी 4.56 वाजता जीसॅट-6 ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्ही-एफ-8 रॉकेटच्या साह्याने हे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाचे वजन 2,140 किलो आहे, तर पुढील 10 वर्ष हा उपग्रह सेवा देणार आहे. भारतीय लष्कराच्या दळणवळण सेवेला बळकट करण्यासाठी हा उपग्रह महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. दुर्गम भागात मोबाइल नेटवर्क उपलब्ध करून देण्यासही या उपग्रहाचा उपयोग होईल.

संदेशवहन सुविधा आणखी मजबूत होणार
जीसॅट-6 ए उपग्रहात सी-बँड कम्युनिकेशनसाठी 6 मीटर व्यासाचा अँटेना आहे. सोबतच 0.8 मीटर व्यासाचा एक फिक्स अँटेना हब कम्युनिकेशनसाठी बसवण्यात आलेला आहे. जीएसएलव्हीचीचे हे 12वे प्रक्षेपण आहे. या रॉकेटची लांबी 49.1 मीटर एवढी असल्याचे इस्त्रोचे माजी अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितले. उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर 6 मीटर व्यासाचा हा अँटिना छत्रीसारखा उघडेल.हा उपग्रह तीन वर्षांपूर्वी अवकाशात पाठवण्यात आलेल्या जीसॅट-6 या उपग्रहाला मदत करणार आहे. या उपग्रहामुळे सॅटलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्युनिकेशन सेवा अधिक प्रभावी होईल. तसेच, दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होईल. या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी जीएसएलव्हीमध्ये क्रायोजेनिक इंजिनासह विकास इंजिनचाही वापर करण्यात आला, असल्याचे किरण कुमार यांनी सांगितले.