जी.एस.ग्राऊंडवरील प्रदर्शनातील चार खाद्यविक्रेत्यांना दंड

0

जळगाव। शहरात जी.एस.ग्राऊंड येथे सुरु असलेल्या इंडियन हॅण्डीक्रॉप्ट्स अ‍ॅण्ड हॅण्डलूम प्रदर्शनातील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना आज अन्न व औषध प्रशासन विभागाने दंड ठोठावला आहे. प्रदर्शनातील राजस्थान फेमस पिकल्स, राजस्थानी चूर्ण मुखवास, श्रीमहालक्ष्मी फुड झोन आणि हिरा नमकीन स्टॉल या चार खाद्य पदार्थ विक्री करणार्‍या दुकानांना अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रत्येकी 1 हजार 500 रुपये दंड केला आहे. दरम्यान, या प्रदर्शनात प्रचंड अफरातफर असून भोंगळ कारभार सुरु आहे. यामुळे इतर साहित्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

इंडियन हॅण्डीक्रॉप्ट्स अ‍ॅण्ड हॅण्डलूम प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पत्रकार सुनिल भोळे व संजय तांबे गेले होते. त्याठिकाणी सुरु असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे कोणतेही परवाने नसल्याचे लक्षात आले. तसेच प्रदर्शनातील सर्वच दुकानांनी कोणत्याही प्रकारची परवानगी काढलेली नाही. पक्के बिले ग्राहकांना दिली जात नाही. प्रदर्शन आयोजकाला याबाबत विचारले असता आयोजकाने देखील उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे सदर पत्रकारांनी संबंधीत विभागाच्या अधिकार्‍याना याबाबत फोन वरुन कळविले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी एस.एस.देवरे यांनी तात्काळ प्रदर्शन स्थळी भेट देवून खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या दुकानांची चौकशी केली असता बर्‍याच त्रुटी त्यांना आढळून आल्या. देवरे यांनी खाद्य पदार्थ विक्री करणार्‍या 4 दुकांनाना मेमो दिले. तसेच अहवाल सहायक आयुक्त अन्न एम.डी.शहा यांच्याकडे पाठविला. दोन दिवस सुटी असल्यामुळे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आज सदर अहवालाची तात्काळ दखल घेत संबंधित दुकानदारांना प्रत्येकी 1 हजार 500 रुपये दंड केला आहे.