डॉ.गिरीश कुळकर्णी ; श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
भुसावळ- जी सॅटमुळे भारतातील दूर संचारक्षेत्रात मोठी क्रांती घडून आली असून 1990 च्या दशकानंतर देशात एकाएकी न्यूज चॅनेलची संख्या वाढू लागली. आधी केबल टीव्ही आणि आता डायरेक्ट टू होम हे तंत्रज्ञान भारताच्या भूस्थिर उपग्रहांमुळेच शक्य झाले. देशातील खेड्यांना जगाशी जोडण्याची किमया भारताच्या भूस्थिर उपग्रहांनी साधल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) 40व्या संप्रेषण उपग्रह जीसॅट-31 च्या यशस्वी प्रक्षेपण झाल्याबद्दल श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम विभागात आयोजित कार्यक्रमात विभाग प्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी दिली. भारताच्या इस्रोने दाखवलेली चिकाटी आणि घेतलेले परिश्रम यामुळेच सर्वात जड उपग्रह अवकाशात पाठवण्याचा विक्रम प्रस्थापित होऊ शकला. जगाच्या पाठीवर अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताचे नाव चमकवण्याची कामगिरी यापूर्वीही इस्रोने अनेकवेळा केली आहे. शिवाय अवकाश संशोधनामध्ये भारताचा दबदबाही निर्माण झाला आहे. अगदी थोड्या कालावधीत इस्रोने केलेली आजपर्यंतची कामगिरी अचंबित करणारी आहे, जीसॅट 31 मुळे दुसंचार क्षेत्रात क्रांती घडणार आहे असे मत डॉ. कुलकर्णी यांनी मांडले.
संशोधनाच्या संधी वाढल्या -प्राचार्य
21 व्या शतकात सर्वसामान्यांच्या हातात अगदी सहजपणे अवकाश तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या, तालुका पातळीवरील महाविद्यालयांत शिक्षण घेतलेल्या बहुतांश शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांची ही कमाल आहे आणि म्हणूनच दुरसंचार क्षेत्रात संशोधनाच्या संधी वाढल्या असून त्यावर विद्यार्थ्यांनी काम करावे, असा सल्ला प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी दिला. जीसॅटचा वापर दूरसंचार क्षेत्रात असंख्य रोजगार उपलब्ध करून देईल, अशी माहिती प्रा.अनंत भिडे यांनी दिली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, अॅकेडमीक डीन डॉ.राहुल बारजिभे, विभाग प्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अनंत भिडे. प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक खडसे, प्रा.निलेश निर्मल, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.धीरज पाटील, विजय विसपुते उपस्थित होते.