जुईनगरमधील उद्यानाची जागा हवी मैदानासाठी

0

नेरुळ : जुईनगर सेक्टर 24 येथे असलेला भूखंड क्रमांक 1 हा उद्यानासाठी न देता मैदानासाठी देण्यात यावा अशी मागणी शिरवणे ग्राम विकास युवा मंच यांच्याकडे करण्यात आली आहे. या भूखंडावर याआधी नर्सरी होती. त्यावेळेस हा भूखंड सिडकोच्या ताब्यात होता. मात्र सिडकोने हा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केला होता. त्यावेळी येथील नर्सरी काढण्यात आली होती. हा भूखंड पालिकेने उद्यानासाठी राखीव ठेवला होता. मात्र शिरवणे गावातील युवक हे हा भूखंड खेळण्यासाठी देण्यात यावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी करत आलेले आहेत.

आणखी उद्यानाची गरज काय?
शिरवणे गावातील युवकांचे म्हणणे आहे की आम्हाला खेळण्यास कोठेही जागा नसल्याने लांब जावे लागते. आज आम्ही आमच्या जमिनी सिडकोला दिल्या मात्र आम्हला मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. उलट याठिकाणी तलावाच्या बाजूलाच उद्यान आहे. त्यामुळे एक बाजूलाच उद्यान असताना पुन्हा शेजारीच उद्यान करण्याची गरज काय? असा प्रश्न येथील युवक विचारत आहेत.

ग्रामविकास युवा मंचतर्फे पालिकेला पत्र
युवकांची मागणी लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवकांनी मार्च महिन्यात झालेल्या महासभेत मैदानाचा हा प्रस्ताव मांडून तो प्रस्ताव संमत झालेला आहे. तसेच याठिकाणी पालिकेतर्फे भिंत बांधण्यात येत आहे. मात्र काही अज्ञातांकडून या ठिकाणी बेकायदेशिरपणे उद्यानाचा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देऊन त्वरित हा बेकायदेशीर फलक हटवण्यात यावा व हा भूखंड मैदानासाठी देण्यात यावा असे पत्र शिरवणे ग्रामविकास युवा मंचतर्फे पालिकेला देण्यात आले आहे.