नेरुळ : जुईनगर रेल्वे स्थानक येथे असलेल्या संघर्ष रिक्षा स्टॅन्ड चालक मालक संघटनेच्या सभासदांनी एकत्र येऊन स्वखर्चाने येथील रस्त्यावरचे खड्डे भरले. त्यामुळे नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. जुईनगर रेल्वे स्थानकातील पूर्वेकडील भागात जुईनगर रेल्वे स्थानक ते शिरावणे फाटा रस्त्यावर अनेक लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दररोज येथे रिक्षा चालवून प्रवाशांची ने आण करून पोट भरणार्या या चालकांना या खड्ड्यांचा दररोज सामना करावा लागत आहे. या त्यातच हे खड्डे काही ठिकाणी इतके खोल झालेले आहेत की, याठिकाणी गाड्या अगदी 10 ते 20 की. मी. प्रति तास या वेगाने चालवावी लागत आहेत.
पालिकेला चपराक
खड्ड्यांमध्ये रिक्षा आपटून गाड्यांचे नुकसान होत आहेच परंतु परंतु शरीरिक अस्थीव्याधी देखील जडू लागल्या आहेत. तर रिक्षा हळू चालवावी लागत असल्याने एकामागोमाग येत असलेल्या ट्रेनमधील प्रवाशांचा देखील खोळंबा होत आहे. त्यामुळे या खड्ड्यांना कंटाळून अखेरीस या रिक्षा चालकांनी स्वखर्चाने येथील खड्डे बुजवले आहेत. त्यामुळे पालिकेला चांगलीच चपराक मिळाली असून यानिमित्ताने पालिकेचा नाकर्तेपणा समोर आला आहे.