Gambling plot foiled in Tahakali Shiwar: 17 gamblers in the net वरणगाव : अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने स्थानिक वरणगाव पोलिसांच्या मदतीने टहाकळी शिवारात छापा टाकून रंगात आलेला जुगाराचा डाव उधळत 17 जुगारींच्या मुसक्या बांधल्या तर दोघे पळण्यात यशस्वी झाले. बुधवारी सायंकाळी झालेल्या कारवाईने जुगारींच्या गोटात खळबळ उडाली. जुगार्यांकडून एक लाख 56 हजारांची रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गणेशोत्सवासाठी आयोजित शांतता समितीच्या बैठकीला मुक्ताईनगरकडून आलेले अपर जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना वरणगांव पोलीस ठाणे हद्दीतील टहाकळी-चिंचोल मार्गावर असलेल्या हॉटेल स्वप्नपूर्णाचे पाठीमागे जुगार सुरू असल्याची माहिती कळताच त्यांनी वरणगावातील बैठक आटोपताच वरणगाव पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ, पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी व इतर पोलिसांसह त्यांच्या पथकातील दोन कर्मचार्यांना कारवाईचे आदेश दिले. बुधवारी सायंकाळी सहा वाजता पोलिसांनी 17 जुगार्यांना ताब्यात घेतले तर दोघे पसार झाले.
या आरोपींना अटक
पोलिसांनी शेख अन्वर शेख अकबर, शेख नईम शेख रहेमान, नितीन निवृत्ती माळी, महेंद्र कडू वंजारी (सर्व रा.वरणगाव), संजय विश्वनाथ पाटील, प्रवीण दगडू पाटील (रा.वढवे, ता.मुक्ताईनगर), संजय श्रीराम चौधरी, विकास नारायण चौधरी, मनोहर देवराम पाटील, अमोल काशीनाथ पाटील (चिंचोल, ता.मुक्ताईनगर), राजेश जगदीश पाटील (रा.काहुरखेडे), गौरव अनिल तळेले, वैभव अशोक पाटील (मुक्ताईनगर), सचिन सोपान इंगळे (हरताळे), गोपाळ रघुनाथ तायडे, देविदास भीमराव सपकाळे (मानपूर), पद्माकर गोपाळ पाटील (सुसरी) तर समाधान बाजीराव पाटील व वसंत भलभले हे दोन जुगारी पसार होण्यात यशस्वी झाले. अपर पोलिस अधीक्षकांचे अंगरक्षक चेतन प्रभाकर निकम (जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयीतांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.