जुगार खेळणार्‍या 11 सटोड्यांवर पोलिसांची कारवाई

0

जळगाव। उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांना काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर जिल्हा पेठ पोलिसांनी निवृत्ती नगरातील मातोश्री डेअरीच्यावर जुगार खेळणार्‍यांवर कारवाई करत 11 जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री पोलिसांनी 1.30 वाजता केली. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी जुगार खेळण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागात तर उघड्यावर पत्त्यांचा डाव रंगलेला असतो. निवृत्ती नगरातील प्लॉट क्रमांक 19 मधील मातोश्री दूध डेअरीच्यावर जुगार सुरू असल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांना मिळाली होती.

उशिरापर्यंत रंगला पत्त्यांचा डाव
जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक एकनाथ पाडळे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी पोलिस उप निरीक्षक अजितसिंग देवरे, राजेंद्र मेेंढे, छगन तायडे, रवी नरवाडे, अल्ताफ पठाण, अजित पाटील, रवी तायडे, शिवाजी धुमाळ यांच्या पथकाला तपासासाठी पाठविले. जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पथक तपास करीत असताना शुक्रवारी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास निवृत्ती नगरतील मातोश्री डेअरीच्यावर असलेल्या खोलीत आवाज आला. त्यावरून पोलिसांच्या पथकाने वर जाऊन बघितले. त्या ठिकाणी पत्त्यांचा डाव रंगला होता. पोलिसांनी सापळा रचून जुगार खेळणार्‍यांना ताब्यात घेतले. त्यात वादग्रस्त तलाठी सत्यजीत नेमाणे यांचाही समावेश होता. ज्यात खोलीत जुगार सुरू होता. ती खोली नेमाणे यांच्या भावाच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यांना घेतले ताब्यात…
निवृत्तीनगरात शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसांनी केेलेल्या कारवाईत सत्यजीत अशोक नेमाणे (वय 38, रा. हायवे दर्शन कॉलनी), अजय पांडुरंग पाटील (रा. संभाजीनगर), नरेंद्र आत्माराम सोनवणे (वय 32, रा. महाबळ), श्रीकांत काशिनाथ अराई (वय 41, रा. भिकचंद जैन नगर), नरेंद्र उर्फ पप्पू सुरेश हजारे (वय 30, रा. हजारे), संजय गोविंद चव्हाण (वय 38, रा. जाकीर हुसेन कॉलनी), योगेश प्रमेराज कंबागी (वय 41, रा. आदर्शनगर), विनोद भगतसिंग शिंदे (वय 38, रा. सहकारी औद्योगिक वसाहत, एमआयडीसी), प्रशांत हिरालाल सोनवणे (वय 37, रा. पिंप्राळा), शिरीष कृष्णाजी पाटील (वय 38, रा. गणेश कॉलनी), पराग तुकाराम पाटील (वय 42, रा. निवृत्तीनगर) यांना अटक केली होती. त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर जामीनावर सोडण्यात आले.