जुगार खेळणे पडले महागात

0

किन्हवली । गणेशोत्सवात पत्त्यांचा जुगार खेळणार्‍या 62 जुगार्‍यांवर किन्हवली पोलिसांनी पहाटे तीन वाजता धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत 1 लाख 26 हजार 180 रोख रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. किन्हवली पोलीसांकडून गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे. किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुसई गावात रात्रीच्या सुमारास समाज मंदिरात पत्त्यांचा डाव रंगला होता याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाड टाकली. त्यावेळी आठ जणांना ताब्यात घेऊन 75 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच डोळखांब येथे पहाटे 3 वाजता एका घरात गणपतीसमोर पत्ते खेळणार्‍या 58 जणांना ताब्यात घेऊन 51 हजार 180 रुपये मिळून असा एकूण 1 लाख 26 हजार 180 रुपयांचा रोख रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर व किन्हवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण फेगडे तसेच किन्हवली पोलीस ठाण्याचे सहकारी कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली आहे.